मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन याच्यावर गंभीर आरोप करीत त्याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने तलाकसाठी नोटीस पाठविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आलियाने पोटगीची रक्कम मिळण्यासाठी नोटीस पाठवली आहे. नवाजुद्दीनने या नोटिशीला कोणतेही उत्तर दिले नसल्याचे आलियाच्या वकिलाने सांगितले. त्यांनी ही नोटीस इमेल आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवली आहे.
आलियाचा वकील म्हणाले, ''हे खरे आहे की, आम्ही नवाजुद्दीन सिद्दीकीला नोटीस पाठवली आहे. ७ मे रोजी आलियाच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली आहे. कोव्हिड-१९मुळे नोटीस स्पीड पोस्टने पाठवता आली नाही. म्हणून ईमेल आणि व्हॉट्सअॅपने नोटीस पाठवली आहे. अजूनपर्यंत नवाजुद्दीनकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. ''
वकीलाने सांगितले, ''मला वाटते की, नोटिशीबद्दल गप्प राहून तो दुर्लक्ष करीत आहे. पोटगी आणि तलाकच्या मागणीसाठी नोटीस पाठवण्यात आलीय. मी नोटिशीच्या तपशीलात जात नाही. परंतु आरोप गंभीर आहेत आणि संवेदनशीलही आहेत. हे आरोप नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबियांविरोधातील आहेत.''
काडीमोड घेण्याच्या कारणाबद्दल आलियाला विचारले असता ती म्हणाली, ''एक नाही अनेक कारणे आहेत. आणि सगळी कारणे गंभीर आहेत. नवाज आणि माझ्यात लग्नानंतर एक वर्षातच म्हणजे २०१०पासूनच बिनसले होते. मी सांभाळून घेत होते मात्र आता सर्व काही ठीक करण्याच्या मर्यादा संपल्या आहेत.''
नवाजुद्दीन आणि आलिया १० वर्षांपासून विवाहाच्या बंधनात होते. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्यात बिनसल्याचे २०१७ पासूनच ऐकायला मिळत होते. परंतु दोघांनीही त्याचे खंडन केले होते.