नागपूर - 'आर्टिकल १५' चित्रपटाच्या विरोधात आज ब्राम्हण सेनेच्या नेतृत्वात नागपूरच्या इंटरनिटी मॉल समोर जोरदार प्रदर्शन करण्यात आले. या विरोध प्रदर्शनात करणी सेना देखील सहभागी झाली होती. चित्रपटात ब्राम्हणांची चुकीची प्रतिमा सादर करण्यात आलेली आहे. ब्राम्हण समाज शांती प्रिय असून जाणीवपूर्वक ब्राम्हण समाजाला चित्रपटाच्या माध्यमातून टार्गेट केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
'आर्टिकल १५' हा चित्रपट नागपुरात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका अखिल भारतीय ब्राम्हण समाजाने आधीच जाहीर केली होती. आज 'आर्टिकल १५' हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर नागपुरातील विविध चित्रपटगुहांमध्ये तो प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शन विरोधात ब्राम्हण समाजातर्फे इटरनिटी मॉल समोर जोरदार प्रदर्शन करण्यात आले. यावेळी संतप्त महिलांनी चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या फोटोवर चपलांची सरबत्ती केली.
२०१४ साली उत्तर प्रदेश येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेवर हा चित्रपट आधारित असून त्यामध्ये हिंदू धर्माची प्रतिमा मालिन करण्यात प्रयत्न झाल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. ब्राम्हण सेनेनं आधीच जाहीर केलेल्या भूमिकेमुळे आज नागपुरातील अनेक थिएटर समोर पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेवटी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन तापलेले वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला आहे.