मुंबई - अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणी सत्र न्यायालयात खटला सुरू होता. गेली 8 वर्षे प्रलंबित असलेला हा खटला आता सीबीआय न्यायालयात चालणार आहे. जिया खानचा कथित प्रियकर अभिनेता सूरज पंचोलीच्या विरोधात आरोप असलेला हा खटला सुरू होता. या खटल्याची सुनावणी सीबीआय कोर्टात व्हावी असे सत्र न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिया खान मृत्यू प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
सूरज पांचोलीच्या अडचणीत वाढ
आदित्य पांचोली याचा पुत्र सुरज पांचोली यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सुरज पांचोली आहे. सूरज पांचोली हा जिया खानचा बॉयफ्रेंड होता. सुरुवातीला हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे होतं. मात्र आता हे प्रकरण सीबीआय कडे गेले आहे. त्यामुळे थंड झालेलं हे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पंचोलीच्या वकिलांनी निर्णयाचे स्वागत केले
सूरज पांचोली यांचे वकील प्रशांत पाटील यांचं असं म्हणणं आहे की, सूरज पांचोली यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सेशन कोर्टानं हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केल्यामुळे याचा आम्ही स्वागत करतो. आम्ही पहिल्या दिवसापासून हे प्रकरण सीबीआयकडे द्यावं अशी मागणी करत होतो. तशी निवेदन देखील आम्ही सादर केली आहेत. त्यामुळे आत्ता सेशन कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतोय.
वकील प्रशांत पाटील पुढे असे म्हणाले की, प्रकरण मागच्या काही वर्षांपासून प्रलंबित होतं आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील सादर केली होती. ज्यामुळे हे प्रकरण सहा महिन्याच्या आत निकाली लागेल. मात्र आता हे प्रकरण सीबीआयकडे दिल्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल.
जिया खान मृत्यू प्रकरण काय आहे?
चित्रपटसृष्टीत एक दोन चित्रपटामधुनच जिया प्रसिद्धी झोतात आली होती. मात्र, अचानक तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. तिच्या आत्महत्येला अभिनेता सुरज पांचोलीला जबाबदार ठरविण्यात आले. आजही त्याच्याविरुद्ध मुंबईच्या न्यायालयात खटला सुरू आहे.
२०१३ साली जियाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आईने मात्र, तिची आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा दावा केला होता. जियाच्या या आत्महत्येचे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले होते.
हेही वाचा - पॅन-इंडिया स्टार प्रभासचा चित्रपट 'राधेश्याम' प्रदर्शित होणार ‘या’ दिवशी!