मुंबई - चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे हिने स्टुडंट ऑफ द ईअर २ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता लवकरच 'ती पती पत्नी और वो'मध्ये झळकणार आहे. अशात तिनं आपल्या बॉलिवूडमधील करिअरवर भाष्य केलं आहे.
अनन्या म्हणाली, स्टुडंट ऑफ द ईअर २मध्ये काम केल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. आता लोकं मला ओळखू लागले आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत आता मी नावं कमवलं आहे, असं मला वाटतं. अशात मी नेहमीचं अतिशय साधं आणि माझ्या वयाप्रमाणं वागण्याचा प्रयत्न करत असते. म्हणूनच मी माझ्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नेहमी मजा मस्ती करत राहते.
बॉलिवूडमधील माझा प्रवास खूप रोमांचक आहे. प्रत्येकाचा आपला एक वेगळा प्रवास असतो आणि माझाही तसाच आहे. एका कलाकाराच्या घरात जन्माला आल्यानं मी स्वतःला नशीबवान समजते. कारण यामुळे मला खूप लहान वयात अनेक दिग्गज व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली, यासोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणंही सहजरित्या शक्य झालं, असं अनन्या म्हणाली.