मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून सारानं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. अशात नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सारानं, आपण आई आणि वडिलांमधील अनेक गुण आत्मसात केले असल्याचं म्हटलं आहे.
सारा म्हणाली, माझे आई आणि वडिल इंडस्ट्रीतील इतर आई-वडिलांप्रमाणे नाहीत. ते खूप वेगळे आहेत. ते कोणत्याच गोष्टीसाठी मला प्रेशर करत नाहीत, हेच त्यांचं वेगळेपण आहे. ते दोघंही जे आपलं मनं म्हणेल तेच करतात आणि त्यांची हीच सवय आपणही आत्मसात केली असल्याचं सारा म्हणाली.
चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास सारा लवकरत इम्तियाज अलींच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यनही झळकणार आहे. सिंबानंतर आता साराच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.