मुंबई - उजाली राज हिने गुलाबो सिताबो सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. शुक्रवारी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाबद्दल बोलताना उजालीने अमिताभ बच्चन आणि आयुष्मान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यानं आनंद व्यक्त केला.
उजाली म्हणाली, पहिल्याच सिनेमात महानायक अमिताभ बच्चन आणि हरहुन्नरी कलाकार आयुष्मानसोबत काम करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. ही संधी मला मिळाली यासाठी मी आनंदी आहे.
उजालीनं म्हटलं, की सिनेमाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. सोबतच अनेकांनी फोन आणि मेसेज करत अभिनयाचे कौतुक केले. प्रेक्षकांचं हे प्रेम आणि प्रतिक्रिया पाहून आनंद झाल्याचं अभिनेत्री म्हणाली. सुजित सरकारद्वारा दिग्दर्शित या सिनेमात उजालीनं आयुष्मानच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. यात तिच्या पात्राचं नाव पायल असं आहे.
राज ही उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील राहाणारी आहे. तिनं सांगितलं, की लॉकडाऊनमुळे सिनेमागृहे बंद झाली. यामुळे, हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होईल याबद्दलच्या सर्व आशा तिने सोडल्या होत्या. अशात आता तिला येणाऱ्या कॉल आणि मेसेजमुळे अतिशय आनंदी असल्याचं तिनं म्हटलं.
राज हिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथे अभिनयाचे शिक्षण घेतले. पहिल्याच चित्रपटात अमिताभ आणि आयुष्मानसोबत काम करणं म्हणजे तिच्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखं होतं. तिनं सांगितलं, की ऑडिशननंतर ती या रोलसाठी शॉर्टलिस्ट झाली होती. यानंतर तिला सिनेमात आयुष्मानच्या दुसऱ्या बहिणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.