मुंबई - 65 व्या अॅमेझॉन फिल्मफेअर पुरस्कारावर 'गली बॉय' चित्रपटाने मोहर उमटवली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबत या चित्रपटाला तब्बल 10 पुरस्कार मिळाले आहेत. यामुळे दिग्दर्शक झोया अख्तर आणि अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री यांच्यासाठी 'अपना टाईम आ गया' अशी भावना देणारा हा सोहळा ठरला आहे. तर यासोबतच ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. आसाम राज्यातील गुवाहटी येथे शनिवारी या पुरास्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी गुवाहटीतील इंदिरा गांधी अॅथेलेटिक स्टेडियम हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते-अभिनेत्रींमुळे उजळून निघाले होते.
यावर्षी '६५ वा ॲमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार २०२० @ऑसम आसाम' हा सोहळा आसाम राज्यात पार पडला. यावर्षी ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी 'फिल्मफेअर जीवनगौरव' तर अभिनेते गोविंदा यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या आपल्या योगदानाबद्दल 'एक्सलन्स इन सिनेमा' या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्कारांमुळे हा सोहळा विशेष लक्षवेधी ठरला. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गल्ली बॉयची निवड करण्यात आली. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणवीर सिंह तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट हिला गौरवण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता विकी कौशल यांनी खुमासदार शैलीत केले.
यासोबतच वरुण धवन, कार्तिक आर्यन, रणवीर सिंह आणि आयुषमान खुराना यांनी यंदाही धमाकेदार सादरीकरण करून सोहळ्याला चांगलीच रंगत आणली. तसेच शाहरुख खान आणि सलमान खान यांनी नव्वदच्या दशकातील गाण्यांवर अफलातून नृत्य सादर केले.
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण कलर्स वाहिनीवर आज (रविवारी) 16 फेब्रुवारीला कलर्स वाहिनीवर होणार आहे.