मुंबई - अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवणीच्या 'कबीर सिंह' चित्रपटाला देशभर भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा १२ दिवसात बॉक्स ऑफिसवरील कमाईचा आकडा २०० च्या पार गेला आहे. या चित्रपटाबाबत एक चकित करणारी बातमी पुढे आली आहे. या चित्रपटाबद्दलची तरुणांमध्ये इतकी जबरदस्त क्रेझ आहे की, 'ए' सर्टिफिकेट असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी अल्पवयीन मुले आधार कार्डवर खोटी जन्म तारीख बनवण्यापर्यंत पोहोचली आहेत.
शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह' चित्रपटाला सेन्सॉरने 'ए' सर्टिफिकेट दिले आहे. त्यामुळे १८ वर्षांखालील मुले हा चित्रपट पाहू शकत नाहीत. मात्र, काही तरुणांनी यावर मात करायचे ठरवले. त्यांनी आपल्या आधार कार्डवरील जन्म तारीख हेराफेरी करीत बदलली. एका मुलाने याबाबत सांगितले, ''मी आणि माझ्या मित्राने आपल्या आधार कार्डला फोटो काढला. मोबाईल अॅपच्या मदतीने त्या आधारकार्डावरील तारीख बदलली. त्यानंतर आम्हाला थिएटरमध्ये जाण्यापासून कोणीही अडवले नाही.''
दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाने सांगितले, ''बुक माय शोच्या मदतीने आम्ही भरपूर तिकीटे बुक केली. आमच्या आधार कार्डवरील जन्म तारखेत बदल करुन घेतला आणि काही मिनीटात आम्ही अॅडल्ट झालो. सिनेमाला गेल्यानंतर आम्हाला कोणीच अडवले नाही. आमच्या वयाची खात्री करण्यासाठी गार्ड विचारतील असे आम्हाला वाटले होते. मात्र तशी तसदी त्यांनी घेतली नाही आणि आम्ही आरामात सिनेमा पाहिला.''