मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान आणि त्याची माजी पत्नी रीना दत्ता २००२ मध्ये विभक्त झाले. त्या अगोदर त्यांचा १६ वर्षाचा सुखी संसार सुरू होता. त्यांनी लपून विवाह केला होता आणि 'कयामत से कयामत तक' चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत तो त्यांनी लपवला होता, हो सर्वश्रुत आहे. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की करियर आणि पत्नीची निवड करायची झाल्यास तो कशाची निवड करु शकला असता.
'कयामत से कयामत तक'च्या रिलीजच्या वेळी, आमिरला त्याच्या पीआर टीमने सांगितले होते की, लग्न झालेल्या हिरोला महिला प्रेक्षकांकडून स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे सिनेमा रिलीज होईपर्यंत लग्नाचे हे रहस्य गुलदस्त्यातच ठेवावे लागेल. आमिरला याबाबत खात्री नव्हती परंतु हा धोका पत्करणे त्याला कठिण जाणारे होते.
रीनासोबतच्या आपल्या लग्नाबद्दल बोलताना आमिरने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, "कयामत से कयामत तकच्या सेटवर रीना अनेकवेळा दिसली असल्यामुळे आई वडिलांपासून ही गोष्ट लपून राहिली नव्हती. पापा कहते है या गाण्यात ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. लग्न झाल्याचे कळल्यामुळे माझ्या करियरवर जर परिणाम होणार असला तर मी त्याची फिकीर करीत नव्हतो. जर मला करियर आणि पत्नीची निवड करायची झाली असती तर मी पत्नीला निवडले असते.''
या चित्रपटातील गाण्यात जेव्हा 'गालो में खिलती कलियों का मौसम' या ओळी म्हणत असतो तेव्हा तो लाल रंगाच्या ड्रेसमधील रीनाच्या डोळ्यात पाहून आमि तिच्या गालांना स्पर्श करुन म्हणताना दिसतो.
यापूर्वी आमिरने खुलासा केला होता की, त्याचा घटस्फोट रीना आणि त्याचे कुटुंबीय दोघांसाठीही “क्लेशकारक” होता. "माझा आणि रीनाचा १६ वर्षांचा संसार होता. जेव्हा आमचे विभाजन झाले तेव्हा ते आमच्यासाठी आणि आमच्या कुटूंबासाठी अत्यंत क्लेशकारक होते. आम्ही या परिस्थित शक्य तितक्या चांगल्याप्रकारे वागण्याचा प्रयत्न केला. विभक्त झाल्यानंतरही रीना आणि मी दोघांनीही एकमेकांबद्दलचे प्रेम किंवा आदर गमावला नाही." असे आमिर खानने सांगितले.
हेही वाचा - केजीएफ स्टार यशने कोरोनामुळे रद्द केले बर्थ डे सेलेब्रिशन
आमिरला मुलगी इरा आणि मुलगा जुनैद ही दोन मुले असून त्याची पहिली पत्नी रीना आहे. आमिरने डिसेंबर २००५मध्ये किरण रावशी लग्नगाठ बांधली आणि २०११ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांनी पहिला मुलगा आझादचे स्वागत केले.