मुंबई - बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोली याच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात एका आघाडीच्या हिंदी चित्रपट अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. वर्सोवा पोलिसांनी या संदर्भात कलम ३७६,३२८,३८४,३४१,३४२,३२३,व कलम ५०६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी आघाडीची अभिनेत्री असून गेल्या काही वर्षांपासून आदित्य पंचोली व पीडित अभिनेत्री पासून वाद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीच्या विरोधात आदित्य पंचोली व त्याच्या पत्नीने अंधेरी कोर्टात मानहाणीचा दावा करणारी याचिका दाखल केली होती. या नंतर या अभिनेत्रीला न्यायालयाकडून समन्स पाठविण्यात आले होते. दरम्यान अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
काय म्हटले आहे तक्रारीत
२००४ ते २००९या दरम्यान आदित्य पंचोली याने पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन जबरी संभोग केला होता. या दरम्यान पीडित अभिनेत्रीचे खासगी फोटो काढून ते पीडितेच्या कुटुंबात सार्वजनिक करण्याची धमकी देत १ कोटींची मागणी केली होती. यात आरोपीने पीडित कडून ५० लाख रुपये घेतले असल्याचे पीडित अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.