नुकतीच चित्रपट गृहे १००% क्षमतेने सुरु झाली असून सिनेनिर्मात्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले आहे. मोठे सिनेमे आणि सणवार यांची हातमिळवणी होत असते आणि सणांच्या आजूबाजूला तथाकथित मोठे चित्रपट प्रदर्शित होत असतात. यावर्षी होळी ला एक मोठा चित्रपट सिनेमाहॉल्समध्ये प्रदर्शित होतोय आणि एक तगडा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर. विद्या बालन आणि शेफाली शहा या सशक्त अभिनेत्री ‘जलसा’ या चित्रपटातून एकत्र येत असून तो चित्रपट डिजिटली प्रदर्शित होतोय. वास्तविकतेला धरून चालणारं कथानक, उत्तम स्टारकास्ट आणि संवेदनशील दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी (तुम्हारी सुलु) याचे संगम असलेला ‘जलसा’ बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक नक्कीच आहे. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी विद्या बालन आणि शेफाली शहा यांच्यासोबत एकत्रितपणे गप्पा मारल्या आणि त्यांची या चित्रपटविषयक आणि इतरही मते जाणून घेतली. विद्या आणि शेफाली या भारतीय पेहरावात आल्या होत्या आणि त्यांनी नेसलेल्या डिझाइनर साड्यांमुळे त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
तुमची पहिली भेट कशी व केव्हा झाली?
विद्या : ही ‘लव्ह स्टोरी’ सुरु झाली ....(खळखळून हसत), आमची भेट निर्मात्याच्या ऑफिसमध्ये घडली. आम्ही तिथे ‘रिडींग’ साठी जमलो होतो. मी थोडी नर्व्हस होते कारण शेफाली एक उत्तम अभिनेत्री आहे म्हणून नव्हे तर आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करणार होतो आणि मला तिच्या अभिनय-पद्धती बद्दल काहीच कल्पना नव्हती. ती भावनिक होऊन वाचते की ‘फ्लॅट-रिडींग’ करते याची कल्पना नव्हती. परंतु मानव ने (अभिनेता मानव कौल) मला सांगितलं होतं की, ‘शेफाली एकदम कूल अभिनेत्री आहे’. परंतु तरीही मी अतिशय खालच्या आवाजात वाचत होते. परंतु भेटल्यावर तिने मला घट्ट आलिंगन दिले आणि आमच्यातील अनोळखीपणा गळून गेला. आम्ही जुन्या मैत्रिणी असल्यासारखे वागू लागलो.
शेफाली : खरंतर मी नेहमीच विद्या ची फॅन राहिले आहे. तिच्याबरोबर काम करायला मिळणार आहे हे समजल्यापासून मी उतावीळ होते तिला भेटण्यासाठी, तिच्यासोबत काम करण्यासाठी. मी फक्त कोलांट्या उड्या मारायची बाकी होते. विद्या बरोबर काम करायची ख़ुशी तर होतीच परंतु सुरेश त्रिवेणी च्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळणार याचापण आनंद होता. महत्वाचं म्हणजे काम करताना आमच्यात कॉम्पीटीशन वगैरे अजिबात नव्हती. जलसाची संहिता इतकी जबरदस्त आहे त्यामुळे दोघींचाही भर चित्रपट उत्तम होण्यावर होता. मी तिचा खूप रिस्पेक्ट करते आणि ती माझा.
तुम्ही दोघांनीही सशक्त आणि स्ट्रॉंग रोल्स साकारले आहेत. तुमच्याबद्दल लोकांचे काही पूर्वग्रह होते/आहेत?
शेफाली : मध्यंतरी मी काम करणं बंद केलं होतं. कुठल्याही भूमिकेसाठी माझा नकार असायचा. माझा नवरा विपुल (शहा) आणि माझी मुलं मला नेहमी सांगतात की मी अजून खूप काम करू शकले असते, खूप प्रसिद्धी मिळवू शकले असते, भरपूर पैसे कमावू शकले असते वगैरे. परंतु जोपर्यंत समोरून मला अशी भूमिका ऑफर होतं नाही जी मला ‘एक्ससाईट’ करेल, तोपर्यंत मी ‘नो’ म्हणणं पसंत करेन. आता ‘दिली क्राईम’ नंतर चित्र बदललेलं आहे आणि माझ्याकडे बऱ्याच उत्तम भूमिका येताहेत. पूर्वग्रहाबद्दल बोलायचं झालं तर, कदाचित मी आधी केलेल्या भूमिकांमुळे असेल कदाचित, पण मी खडूस आहे ही धारणा होती/आहे. अनेकदा दिग्दर्शक इतर कलाकारांना सांगतात की शेफाली एकदम सिरीयस अभिनेत्री आहे त्यामुळे तिला रुचणार नाही असे वागू नका. परंतु जेव्हा लोकं माझ्याबरोबर काम करतात तेव्हा काही तासांमध्येच त्यांचा भ्रम गळून पडतो आणि तेच म्हणतात तू किती ‘कूल’ आहेस आणि तुझ्याबद्दल उगाचच काहीबाही बोललं जातं.
विद्या : माझ्याबद्दल एक वेगळीच धारणा निर्माण झाली होती. २००७-२००८ च्या सुमारास. माझे चित्रपट न चालल्यामुळे कदाचित किंवा मी चित्रपटाला १००% दिलं नसेल किंवा बऱ्याच जणांना मी ‘अनलकी’ वाटली असेन म्हणून मला बऱ्याच चित्रपटांतून ‘रिप्लेस’ करण्यात येत होतं. तब्बल १२ चित्रपटांतून मला काढण्यात आलं होतं. मला अतोनात दुःख झालं होतं आणि प्रचंड रागही येत होता. मी के बालचंद्रन यांचे दोन चित्रपट करीत होते, म्हणजे मला साइन करण्यात आलं होतं. त्यातील एकाचं शूटिंग न्यूझीलंड ला होणार होतं. बरेच दिवस झाले परंतु पासपोर्ट ई. साठी मला काहीच विचारपूस केली गेली नव्हती. शेवटी माझ्या आईने बालचंद्रन यांच्या मुलीला फोन लावला आणि विचारलं तेव्हा तिने सांगितलं की मी रोलसाठी सूट होत नाहीये म्हणून रिप्लेस करण्यात आलं आहे. मला साधं कळविण्यातही आलं नव्हतं. मला हे आईने सांगितलं तेव्हा मी एनसीपीए च्या (मरीन ड्राइव्ह) जवळपास होते. मी खचून गेले होते आणि चालत राहिले. वांद्रे आलं तेव्हा मला जाणवलं की मी चालत-चालत इतक्या दूरवर पोहोचलीय आणि माझा बांध फुटला व मग मी ढसाढसा रडले, एकटीच. मला खूपच त्रास झाला होता माझ्याबद्दलच्या गैसमजामुळे. परंतु आता बरीच वर्षे निघून गेलीयेत आणि त्या कटू आठवणी धूसर झाल्या आहेत.
मग तू प्रसिद्ध झाल्यानंतर ‘त्या’ निर्मात्यांनी तुला रोलसाठी विचारलं का?
हो ना. त्यातील बऱ्याच जणांनी मला भूमिका ऑफर्स केल्या होत्या. त्यातील एका निर्मात्याने तर अगोदर मला तोंडावर ‘तू कुरूप आहेस म्हणून काढून टाकतो आहोत’ असं सांगितलं होतं. माझ्यावर त्याचा इतका वाईट परिणाम
झाला होता की ६ महिने मी आरश्यात बघायला पण घाबरत होते. तर त्या महाशयांनीदेखील मला चित्रपट ऑफर केला होता. माझ्यातील चांगुलपणा मी नेहमीच शाबूत ठेवते म्हणून मी त्याला भेटले, रोल ऐकला आणि विनम्रपणे त्याची ऑफर नाकारली.
विद्या, तू ‘जलसा’ आधी नाकारला होतास. का?
मला कॉन्फिडन्स नव्हता की मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन. ही भूमिका ग्रे शेड ची आहे आणि मला प्रेक्षक यात स्वीकारतील की नाही याबद्दल मी साशंक होते. प्रत्येक स्त्रीला आपण सर्वांना आवडावे असे वाटत असते आणि त्यामुळेच मी तो निर्णय घेतला असावा. नंतर कोरोना काळ आला आणि लॉकडाऊन मध्ये घरी बसल्यावर अनेक जणांना अनेक गोष्टींची उपरती झाली त्याप्रमाणे मलाही झाली. त्या काळात माझे मतपरिवर्तन झाले. ही व्यक्तिरेखा थोडीशी ‘ग्रे’ असली तरी ‘प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर असतो’ हे मला पटले. ती व्यक्तिरेखा आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक आहे आणि परिस्थितीजन्य निर्णय घेते. त्यामुळे मला आनंद आहे की मी ‘जलसा’ करण्यास होकार दिला.
तू ‘मोठ्या’ स्टारसोबत काम करताना दिसत नाहीस याचे कारण काय? तसेच तुमचा ओटीटी वर काम करण्याचा अनुभव कसा आहे?
विद्या : तसले रोल्स घेऊन माझ्याकडे कोणी येतंच नाही. मी अक्षय (कुमार) सोबत काम केलंय पण दुसऱ्या ‘मोठ्या’ स्टार्स बरोबर मला कुणी फिल्मच ऑफर केलेली नाहीये. आणि मला त्याची खंत नाहीये. आता कथा महत्वाची होत चाललीय. स्त्रीप्रधान चित्रपट बनू लागलेत. खरंतर स्त्रीप्रधान, महिलाभिमुख आदी शब्द मला आवडत नाही. चांगल्या चित्रपटासाठी भूमिका, पुरुष अथवा स्त्री, उत्तम असणे गरजेचे आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सने संपूर्ण खेळ बदलला आहे. इथे स्टार्स चालत नाहीत तर उत्तम कलाकार असणे गरजेचे झाले आहे. तुम्ही बघितलेच असेल की ओटीटी वर वेगळे स्टार्स निर्माण झालेत. मला तर अप्रतिम भूमिका करायला मिळताहेत मग मी कुठल्या स्टार्ससोबत भूमिका मिळण्याची वाट का बघत बसू? मी माझ्या ‘स्पेस’ मध्ये खूष आहे आणि उत्तमोत्तम भूमिका करण्यासाठी उत्सुक आहे.
शेफाली : माझ्यासाठी तर ओटीटी माध्यम वरदान ठरलं आहे असं मी म्हणेन. ‘दिल्ली क्राईम’ हिट झाल्यानंतर माझ्याकडे उत्तमोत्तम भूमिका येताहेत. खरंतर ही सिरीज कुठे रिलीज करायची हे ठरलं नव्हतं परंतु ओटीटी वर प्रदर्शित झाल्यावर तिला प्रेक्षकांचा उदंड पाठिंबा मिळाला तसेच अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाले. कदाचित या माध्यमावरचे पुरुषी वर्चस्व कमी झाले असावे कारण अनेक स्त्री कलाकार उत्तमोत्तम भूमिका सादर करताना दिसताहेत. अनेक प्रसिद्ध स्त्री कलाकार या माध्यमावर आपले अभिनयगुण दर्शविताना दिसतात जे पूर्वी पुरुषप्रधान चित्रपटांतून साध्य होत नव्हतं. मी तरी या माध्यमावर खूष आहे कारण मला माझ्या मनाजोगतं काम करायला मिळतंय.
विद्या : मी पुढे सांगू इच्छिते की आज आम्ही ज्या वळणावर आहोत त्याची बेगमी आधीच्या पिढीतल्या महिला कलाकारांनी करून ठेवलीय. मीना कुमारी, हेमा मालिनी, जया बच्चन, रेखा, शबाना आझमी त्याचसोबत श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित सारख्या अनेकींनी ही वाट चोखाळली म्हणून आमच्यासारख्या अभिनेत्रींना आता सशक्त भूमिका करायला मिळताहेत. आणि चांगल्या भूमिकांसाठी मी नेहमीच भुकेली असते.
हेही वाचा - Vivek Agnihotri Y Security : 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना 'वाय' श्रेणीची सुरक्षा