मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान हिने आत्महत्या केली होती. त्यावरुन आता पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय. तिचा मृत्यू हा बलात्कार करुन खून केला असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केलाय. याबाबत पोलिसांनी नीट तपास केला नसल्याचाही आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर दिशाचे वडिल सतीश सालियान पुढे आले आहेत. त्यांनी बुधवारी पोलिसांना पत्र लिहून अनेक खुलासे केले आहेत.
दिशाच्या मृत्यूमध्ये कोणत्याही दगा फटक्याचा मला संशय नाही आणि मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी केलेल्या चौकशीवर मी पूर्णपणे समाधानी आहे, असे दिशाच्या वडिलांचे म्हणणे असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सतिश सालियान यांनी बुधवारी सहाय्यक पोलीस आयुक्त मालवणी यांना पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी मुंबई पोलिसांवर त्यांना विश्वास असल्याचे सांगितले आहे. तसेच दिशाच्या मृत्यूच्या चौकशीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून माध्यमे त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देत असल्याचा आरोप सतिश यांनी केला असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
सतीश सालियान यांनी १३ जुलैला मालवणी पोलीस ठाण्यात लोकांनी समाजमाध्यमांवर शेअर झालेल्या “अपमानजनक” पोस्टविरोधात लेखी तक्रार केली होती. त्या पोस्टमुळे दिशा आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप सतिश यांनी केला होता.
हेही वाचा - अभिनेता समीर शर्माची गळफास घेऊन आत्महत्या
सतिश सालियान यांनी पत्रातून आरोप आहे की " दिशा सिनेक्षेत्रातील दिग्गजांसोबत आणि राजकारण्यांसोबत पार्ट्या करते, तिचा बलात्कार करून खून झाला या सर्व गोष्टी माध्यमांनी तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. याप्रकरणी पत्रकार, प्रभाव टाकणारे लोक, राजकारणी आणि माध्यमांनी त्यांच्या कुटुंबाप्रती असंवेदनशील कृत्य केल्याबद्दल संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी विनंतीही सालियान यांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय दिशा सालियानने 8 जून रोजी मलाड भागातील एका उंच इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशा सालियानच्या मृत्यूच्या संदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू अहवाल नोंदविला गेला आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करत असलेल्या मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ५० हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये सुशांतच्या कुटुंबीयांसह, त्याचा कूक आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचा समावेश आहे.