मुंबई - 'एम.एस धोनी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटानी लवकरच सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अली अब्बास जफर यांच्या 'भारत' चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. सलमानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याची संधी मिळाल्याने आनंदी असल्याचं दिशानं नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
सलमान एक उत्तम अभिनेता असून तो नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जात असतो. यासोबतच तो आपल्या कामासाठी प्रचंड मेहनत घेतो आणि समोरच्यालाही प्रोत्साहन देतो, असे म्हणत तिने सलमानसोबतचा कामाचा अनुभव चांगला असल्याचे म्हटलं आहे.
तर सलमानसोबत स्क्रीन शेअर करण्याची कदाचित ही आपली शेवटची वेळ असणार असल्याचेही तिने स्पष्ट केलं. यामागचं कारण विचारलं असता सलमान आणि माझ्या वयात खूप अंतर आहे. त्यामुळे त्याच्या अपोझिट मी काम करू शकत नाही, असं तिनं सांगितलं. भारतच्या कथेत सुरूवातीला सलमानचं वय कमी दाखवण्यात आल्यानं आपल्याला ही भूमिका मिळाल्याचं तिनं म्हटलं आहे.