मुंबई - अभिनेता दिलजीत दोसन्ज आणि मनोज वाजपेयी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटावर भर गर्दीत चित्रीकरण केले. अभिषेक शर्माच्या आगामी 'सूरज पे मंगल भारी' या विनोदी चित्रपटाचा 'क्लायमॅक्स' सीन येथे चित्रीत करण्यात आला.
'सूरज पे मंगल भारी' या चित्रपटाचे शूटींग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या प्लॅटफॉर्मवर सुरू आहे समजताच बघ्यांनी तुफान गर्दी केली. अभिनेत्यांची एक झलक पाहण्यासाठी प्रवाशी उतावीळ झाले होते. सीएसटीवर येणारा प्रत्येक प्रवाशी प्लॅटफॉर्म क्रमांक १० कडे डोळे लावून होता. याच प्लॅटफॉर्मवर सलग दोन दिवस शूटींग चालले. विशेष म्हणजे 'सूरज पे मंगल भारी' चित्रपटाचा सीनही येथेच शूट करण्यात आला.
रेल्वे विभागाची पूर्वपरवानगीने हे शूट सुरू होते. संपूर्ण रेल्वे यासाठी शूटींगसाठी वापरण्यात येत होती. कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन्स पार्किंगमध्ये लावण्यात आल्या होत्या. मात्र ब्रेकमध्ये कोणीही व्हॅनमध्ये फिरकत नव्हते. रेल्वेमध्येच जेवण, मेकअप आणि कपडेही बदलण्यात आल्याचे सेटवरील सूत्रांनी सांगितले.
'सूरज पे मंगल भारी' या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण खऱ्या घटनास्थळांवर करण्यात आलंय. दक्षिण मुंबईतील काही ठिकाणी चित्रीकरण पार पडले. फिल्म सिटीतही मोठा चाळीचा सेट उभारण्यात आला होता. रेल्वे स्टेशवर क्लायमॅक्स शूट होणार असल्यामुळे सेट उभा करण्याचा पर्याय होता. मात्रतो वास्तव वाटला नसता. यासाठी सीएसटीवर शूट करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला.
गर्दी लक्षात घेऊन शूटींगचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी सुमारे १५० ज्यूनिअर आर्टीस्ट प्रवाशी बनून प्लॅटफॉर्मवर होते. फिल्मच्या क्रूने रेल्वेच्या नियमांचा भंग होऊ नये यासाठी काटेकोरपणे दक्षता पाळल्याचे सूत्राने सांगितले.