मुंबई - बॉलिवूड व टीव्ही अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने त्याच्या वांद्रे येथील घरात आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले. सुशांतचा मित्र असेलेल्या कॉमेडियन सुनील पाल याला शोक व्यत्त करताना अश्रू अनावर झाले. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
माझ्या मित्रा, सुशांत तू हे टोकाचे पाऊल का उचललेस? असा सवाल त्याने या व्हिडिओमधून विचारला आहे. तुझे करिअर चांगले सुरू होते. बॉलिवूडमध्ये तू स्वतःच स्थान निर्माण करत होतास, अशावेळी नक्की काय झाले की, तुला हे जग सोडून जावं वाटलं, असे प्रश्न विचारत सुनीलने त्याच्या भावना व्यक्त केल्या. 2020 हे वर्ष आणखी काय काय बघायला लावणार आहे, असेही त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूत याची बॉलिवूडमध्ये कायमच एक शांत, संयमी आणि तितकाच मेहनती अभिनेता अशी ओळख होती. त्यामुळे त्याच्या जाण्याचा सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अनेक सहकलाकारांनी त्याच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला आहे.