मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालचं पात्र साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाला होती. आता चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.
दिल्लीत हे पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झालं. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सेटवरील काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर यात अभिनेता विक्रांत मेस्सी दीपिकाच्या अपोझिट झळकणार असून चित्रपटात तो लक्ष्मीच्या पतीची भूमिका साकारणार आहे.
२०२० मध्ये १० जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, यापूर्वी चित्रपटाच्या सेटवरील अनेक व्हायरल व्हिडिओ प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. याला मिळालेला प्रतिसाद पाहता दीपिकाच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहे.