मुंबई - प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्या कडून १०० कोटी रुपयांच्या कार घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असताना या संदर्भात दिलीप छाब्रिया यांना आणखीन एक प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. भारतीय क्रिकेट संघातील एका क्रिकेटपटूला चुना लावल्यानंतर प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याला सुद्धा तब्बल ५ कोटी ७० लाख रुपयांना दिलीप छाब्रिया याने फसवल्याचा प्रकार समोर आला होता. त्या नंतर दिलीप छाब्रिया यांच्या विरोधात कपिल शर्मा याने तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई मुख्य दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर ही अटक कारवाई करण्यात आली आहे.
असा लावला होता कपिल शर्माला चुना
दिलीप छाब्रिया यांना व्हॅनिटी व्हॅन बनवून देण्यासाठी मार्च २०१७ मध्ये कपिल शर्मा याने ५ कोटी ३० लाख रुपये दिले होते. कपिल शर्मा यांनी व्हॅनिटी च्या संदर्भात दिलीप छाब्रिया यांच्याकडे विचारपूस केली असता 2018 मध्ये जीएसटी आल्याने ४० लाख रुपये दिल्यावर लवकरात लवकर गाडी बनवून देतो असं दिलीप छाब्रिया यांनी कपिल शर्मा यास सांगितले होते. दिलीप यांच्या म्हणण्यानुसार कपिल शर्मा याने पुन्हा एकदा 2018 मध्ये दिलीप छाब्रिया यांना चाळीस लाख रुपये दिले होते . मात्र एवढे पैसे देऊनही कपिल शर्मा यास व्हॅनिटी व्हॅन मिळाली नाही.
१२ लाखांचे पार्किंगचे बिल
मात्र पैसे देऊनही व्हॅनिटी व्हॅन न मिळाल्यामुळे कपिल शर्मा याने एनसीएलटि तक्रार करून डीसी कंपनीचे बँक खाते गोठवले होते. या नंतर कपिल शर्मा यांच्याकडे पुन्हा दिलीप छाब्रिया याने ६० लाख रोकड मागितले होते.कपिल शर्मा याने ६० लाख देण्यास नकार दिल्यावर दिलीप छाब्रिया यांनी कपिल शर्मा याच्या अर्धवट काम झालेल्या व्हॅनिटी व्हॅन च्या पार्किंगच्या संदर्भात १२ लाख रुपयांचे बिल पाठवले होते . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यासंदर्भात कपिल शर्मा याने सप्टेंबर २०२० मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दिलीप छाब्रिया यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. यासंदर्भात गुरुवारी कपिल शर्मा याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच मध्ये येऊन आपली जबानी दिलेली आहे.
हेही वाचा - बॉलिवूड ट्विट प्रकरण; कंगनाला मुंबई उच्च न्यायलयाचा दिलासा कायम