मुंबई - अजय देवगणने त्याच्या तिसऱ्या दिग्दर्शकिय चित्रपटाची घोषणा केलीय तेव्हापासून ‘मे-डे’ चित्रपट चर्चेत आहे, अर्थातच चांगल्या कारणांसाठी. ‘फूल और कांटे’ पासून बॉलिवूडमध्ये पाय ठेवलेला, दोन चालत्या मोटारसायकलींवर दोन्ही पाय ठेऊन एन्ट्री घेतलेल्या, अजय देवगणने फिल्म इंडस्ट्रीमध्ये तीस वर्षे पूर्ण केली आहेत. ’यू मी और हम’ या चित्रपटाद्वारे त्याने २००८ साली दिग्दर्शनक्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर २०१६ साली त्याने ‘शिवाय’ चे दिग्दर्शन केले व आता ‘मे-डे’ साठी त्याने दिग्दर्शकाची टोपी डोक्यावर चढवलीय.
दिग्दर्शकाला चांगल्या कलाकारांची फौज मिळाली तर तो उत्तम चित्रपट देऊ शकतो, अर्थातच उत्तम संहिताही आवश्यक असते आणि या बाबतीत अजय सुदैवी म्हणायला हवा . ‘मे-डे’ मध्ये अमिताभ बच्चन, कालच ते सेटवर रुजू झाले, रकुल प्रीत सिंग, आकांक्षा सिंग, अंगिरा धर यांची आधीच निवड झालीय. आता त्यांच्यासोबत बोमन इराणी सुद्धा काम करणार आहे. ते एका प्रसिद्ध व प्रतिष्ठित विमानकंपनीच्या शीर्ष मालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
बोमन इराणी यांनी ‘तेज’, ‘टोटल धमाल’ सारख्या चित्रपटांमधून अजय देवगण सोबत कामं केली आहेत. तसेच त्यांनी अमिताभ बच्चन सोबत कैक चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. ‘’तीन पत्ती’, वक्त : द रेस अगेन्स्ट टाइम’, ‘लक्ष्य’, ‘भूतनाथ रिटर्न्स’ सारख्या अनेक चित्रपटांमधून बोमन-अमिताभ यांची अभिनय-जुगलबंदी रंगली होती आणि आता ते दोघेही पहिल्यांदाच अजय देवगणच्या दिग्दर्शनाखाली काम करताहेत. फिल्म सिटीमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरु असून बोमन इराणी लवकरच तिथे दाखल होतील.
हेही वाचा - जारेड लेटोने शेअर केला 'ऑस्कर ट्रॉफी' गायब झाल्याचा अनुभव
अजय देवगण निर्मित, अभिनित आणि दिग्दर्शित ‘मे-डे’ २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - शर्मन जोशीचे वडील दिग्दर्शक अरविंद जोशी यांचे निधन