मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत आगामी चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अद्याप शीर्षक ठरले नसलेला हा चित्रपट इंदिरा गांधींचा चरित्रपट असणार नाही. राजकीय विषयावरील या चित्रपटात अनेक कलाकार काम करणार आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अलिकडे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती आपली राजकीय मतेही बिनधास्त मांडत असते. काँग्रेस पक्षावर टीका करण्याची ती संधी सोडत नाही. अशावेळी तिने इंदिरा गांधीवर चित्रपट बनवण्याचा संकल्प सोडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
"होय, आम्ही या चित्रपटावर काम करत आहोत आणि पटकथा अंतिम टप्प्यात आहे. हा चित्रपट इंदिरा गांधींचा बायोपिक नाही, हा एक भव्य काळातील चित्रपट आहे, सध्याच्या भारताची सामाजिक - राजकीय पार्श्वभूमी माझ्या पिढीला समजून घेण्यास मदत करेल असा हा एक राजकीय ड्रामा आहे," असे कंगनाने आपल्या कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
"अनेक नामांकित कलाकार या चित्रपटाचा एक भाग असतील आणि अर्थातच भारतीय राजकारणाच्या इतिहासात सर्वात उत्कृष्ट नेत्या साकारण्यासाठी मी उत्सुक आहे," असे कंगना म्हणाली.
कंगनाने पुढे म्हणाली की, “हा चित्रपट एका पुस्तकावर आधारित आहे”, मात्र तिने अधिक तपशील दिलेला नाही. कंगना आगामी काळात इमरजेंसी आणि ऑपरेशन ब्लू स्टार या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
शुक्रवारी कंगना राणौतने तिच्या संग्रहातील एक अनोखा फोटो शेअर केला आहे. यात ती इंदिरा गांधींच्या वेशभूषेत दिसत आहे. मात्र हा फोटो इंदिरा गांधींच्यावर बनत असलेल्या चित्रपटाचा लूक नाही, याचा खुलासाही तिने केलाय. हा फोटो २०१० मध्ये फोटोग्राफर जतीन कंपानी यांनी काढलेला आहे. हा फोटो काढताना मी कधीतरी इंदिरा गांधींची भूमिका साकारु शकेन असे वाटले नव्हते, असे तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
यापूर्वी 'रिव्हॉल्व्हर राणी'मध्ये कंगनाच्या सोबत काम करणारा दिग्दर्शक साई कबीर इंदिरा गांधींवरील चित्रपटाची कथा, पटकथा लिहित असून या चित्रपटाचे दिग्दर्शनही तो करणार आहे.
हेही वाचा - ‘आरएसव्हीपी‘ च्या आगामी ‘डीसपॅच’ मध्ये शीर्षक भूमिकेत पद्मश्री मनोज बाजपेयी!
या भव्या पीरियडड्रामा चित्रपटात अनेक दिग्गज व्यक्तीरेखा पाहायला मिळणार असून संजय गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्री यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या भूमिका पडद्यावर पाहायला मिळतील.
सध्या कंगना रणौत भोपाळमध्ये 'धाकड' चित्रपटाचे शूटिंग करीत असून या ठिकाणी तिच्या भेटीसाठी साई कबीर आला होता. चित्रपटाच्या पटकथेबाबत दोघांनी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - टी-सिरीजच्या सस्पेन्स थ्रिलरमध्ये अभिनेता दर्शन कुमार दिसणार आर माधवन सोबत!