पुणे - निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या घरी तब्बल ११ तास तपासणी केल्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी बाहेर पडले आहेत. अनुराग कश्यपचा लॅपटॉप, मोबाईल व बँकेशी संबंधित कागदपत्रे या अधिकाऱ्यांनी बरोबर नेली आहेत. ११ तासाच्या या चौकशीमध्ये अधिकाऱ्यांनी फँटम या फिल्म प्रॉडक्शन संबंधी माहिती घेतली.
दरम्यान पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अनुराग आणि तापसी हे दोघं सध्या पुण्यात एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी उपस्थित आहेत. पुण्यातल्या वेस्टिन हॉटेल या ठिकाणी या दोघांची सध्या चौकशी झाल्याचे वृत्त आहे. आयटी विभागाचे अधिकारी बुधवारी पुण्यात दाखल झाले होते. त्यांनी रात्री उशिरापर्यंत अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांची चौकशी केली. त्यांच्या जवळच्या कागदपत्रांची तपासणी केली. आजदेखील आयटी विभागाकडून या दोघांची चौकशी केली जात आहे. या वेळी त्यांचा क्रूदेखील त्यांच्या सोबत होता. एकंदरीतच आयटी विभागाकडून ही चौकशी वेस्टन हॉटेलमध्ये झाली असल्याचे बोलले जातेय बाबतचा आढावा घेतलाय पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी....
२२ ठिकाणी कारवाई
दरम्यान अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरी आयकर विभागाची चौकशी अद्यापही सुरू आहे. आयकर विभागाला तापसीच्या घरी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. ज्याच्या आधारे तिच्या कार्यालयाची तपासणी केली जात आहे. मुंबईसह पुणे येथील २२ ठिकाणी ही कारवाई आयकर विभागाकडून केली जात आहे. या छाप्यामध्ये नेमके कोणते पुरावे हाती लागले आहेत याचा तपशील अद्याप पुढे आलेला नाही.
काल मुंबईत पडल्या धाडी
आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सने आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवल्याचे दिसत आहे. इन्कम टॅक्सने मुंबईत काल अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप आणि विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली. मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरू होते. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांनी मागील काही दिवसात केंद्र सरकारविरोधात अनेक ट्विट केले होते. त्या बदल्यात हे धाडसत्र असल्याची चर्चा सुरू आहे.
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू का रडारवर?
अनुराग कश्यप आणि टापसी पन्नू यांनी सध्या देशात सुरु असलेल्या मुद्द्यांवर प्रखर मत मांडले होते. तापसी पन्नूने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे समर्थक केले होते. जेव्हा पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत सोशल मीडियावर भाष्य केले तेव्हा बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सरकारच्या बाजूने ट्विट केले होते. या सेलिब्रिटींविरोधात तापसी पन्नूने आपले मत व्यक्त केले होते. अनुराग कश्यप यांनी सीएएसारख्या मुद्द्यांवरून मोदी सरकारविरोधात भाष्य केले होते.
काय आहे प्रकरण?
फॅन्टम फिल्म्स या निर्मिती संस्थेत कर चोरीच्या घटना समोर आल्याने आयकर विभागाने हे पाऊल उचलले. अनुराग कश्यप, विकास बहल व मधू मंटेना हे तिघेही फॅन्टम फिल्म्सचे हिस्सेदार आहेत, तर अनुराग या संस्थेचे मालक आहेत. २०१० साली या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. ही संस्था चित्रपट निर्मिती व वितरणाचे काम करायची. २०१५ साली रिलायन्स इंटरटेन्मेण्टने या संस्थेची ५० टक्के भागीदारी स्वीकारली होती. २०१८ साली कलाकाराचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप विकास यांच्यावर होता. त्यानंतर, त्यांना या संस्थेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर, ही संस्था बंद करण्यात आली. मुंबई आणि पुण्यात मिळून एकूण २२ ठिकाणी आयकर विभागाची ही मोहीम सुरू आहे.
या फिल्म फॅन्टम कंपनीने बनवल्या -
फॅन्टम फिल्म्स कंपनीची पहिली फिल्म लुटेरा 2013 मध्ये रिलीज झाली होती. यानंतर हंसी तो फंसी, क्वीन, अगली, NH-10, हंटर, मुंबई वेलवेट, मसान, शानदार, उड़ता पंजाब, रमन राघव-2, रॉन्ग साइड राजू, मुक्केबाज, सुपर 30 आणि धूमकेतु यासारखे दर्जेदार फिल्म फॅन्टम कंपनीने बनवल्या होत्या.
या कलाकारांच्या घरावर छापा
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल यांच्या मुंबईतील कार्यालय व घरावर आयकर खात्याकडून बुधवारी छापेमारी करण्यात आली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार फॅन्टम फिल्म संबंधात ही छापेमारी करण्यात आली असून, मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली.