मुंबई - 'मिस्टर इंडिया' सिनेमातील अमरीश पुरी यांनी साकारलेला मोगँबोचा रोल कोण विसरु शकतं. या रोलसाठी आजही अमरीश यांची आवर्जुन आठवण काढली जाते. मात्र, खरंतर या रोलसाठीची पहिली पसंती अमरीश पुरी नव्हतेच हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल.
शनिवारी अमरीश पुरी यांचा ८७ वा जन्मदिन होता. याच पार्श्वभूमीवर अमरीश पुरी यांच्याबद्दल बोलताना अनुपम खेर यांनी याबद्दल खुलासा केला आहे. खेर म्हणाले, मोगँबोच्या रोलसाठी पहिल्यांदा मलाच विचारणा करण्यात आली होती. मात्र, एक ते दोन महिन्यांनंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याजागी अमरीश पुरी यांना रिप्लेस केले.
एखाद्या चित्रपटातून अशा प्रकारे पत्ता कट केल्यानंतर निश्चितच प्रत्येक कलाकाराला वाईट वाटतं. मात्र, जेव्हा मी हा चित्रपट आणि यातील अमरीश पुरींनी साकारलेला मोगँबोचा रोल मी पाहिला, तेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांनी या रोलसाठी अमरीश पुरींची निवड करून अगदी योग्य निर्णय घेतला, असे मला वाटल्याचे अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.