मुंबई - लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सूदने अनेक कामगारांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत केली. याच कारणामुळे अभिनेता अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अशात आता सोनूने उत्तर प्रदेशातील आणखी एका गरजूला मदत केली आहे. या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, तिच्या अंत्यसंस्कारासासाठी या व्यक्तीला वाराणसी येथे जायचे होते.
एका चाहत्याने सोनूला सोशल मीडियावर याबद्दल माहिती देत मदत मागितली. यानंतर अभिनेत्याने 40 वर्षीय सीताराम विश्वनाथ शुक्ला यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली. चाहत्याने ट्विट केले होते, की माझ्या शेजाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तिच्या अंत्यसंस्कारासाठी घरातील तिघांना वाराणसी येथे जायचे आहे. सोनू सूद सर कृपया मदत करा. आम्हाला तुमच्याशिवाय इतर कोणीही पर्याय नाही.
सोनूने यावर रिप्लाय देत म्हटलं, या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो. त्यांना उद्याच घरी पाठवू. लवकरच ते आपल्या घरी पोहोचतील. यानंतर सोनूने त्या व्यक्तीला वाराणसी येथे पाठवले. अभिनेत्याने लॉकडाऊनच्या काळात कामगारांची केलेली मदत कौतुकास्पद आहे. यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह अनेकांनी सोनूचे कौतुक केले आहे.