मुंबई - बॉलिवूडमधील चतुरस्त्र अभिनेत्रींमध्ये आलिया भट हे नाव मोडतं. ‘उडता पंजाब, ‘हायवे’ सारख्या आशयघन चित्रपटांतून तिने आपले अभिनयसामर्थ्य दर्शविले तसेच ‘स्टुडंट ऑफ द ईयर, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, सारख्या व्यावसायिक चित्रपटांतून तिने स्टारडम मिळविला. ‘राझी’ आणि ‘गली बॉय’ सारख्या चित्रपटांतून आलियाने स्टारडम सोबत संवेदनशील अभिनेत्री याचे उत्तम दर्शन घडविले आहे. आता आलिया भट संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानिमित्ताने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत तिने संवाद साधला. आपल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ मधील भूमिकेबाबत सांगताना आलिया म्हणाली, “‘गंगुबाई काठियावाडी’ मधील माझी भूमिका आतापर्यंतच्या भूमिकांपैकी सर्वात कठीण भूमिका आहे. खरंतर संजय सरांबरोबर काम करण्याची इच्छा होतीच आणि जेव्हा त्यांनी मला ही भूमिका ऑफर केली तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. साधारण दोनेक वर्षे ही भूमिका माझ्यासोबत आहे. गंगुबाई एक लढाऊ वृत्तीची व्यक्ती आहे. तिने आयुष्यात खूप भोगले आहे आणि त्या वेदनांमधून तिने आपल्यात लढाऊ बाणा तयार केला असून ती तो इतरांच्या दुःख निवारणासाठी वापरते.”

भूमिकेच्या तयारीसाठी कामाठीपुऱ्यातील देहविक्रय करणाऱ्या व्यक्तींना भेटली वगैरे का यावर बोलताना आलिया म्हणाली, “नाही. म्हणजे सुरुवातीला तसं काही करणार असल्याचं टीमकडून समजलं होतं. परंतु मध्ये कोरोनाच्या समस्येमुळे ते बारगळलं असावं. परंतु मला स्वतःला त्यांना काही विचारावंसं वाटलं नाही कारण ‘तुला वेश्याव्यवसायात ढकलल्यानंतर कसं वाटलं’, असं कसं विचारणार? त्यातच हा चित्रपट कामाठीपुरा येथील देहविक्रय करणाऱ्यांबद्दल नाहीये. हा चित्रपट एका व्यक्तीबाबत आहे जिने इतरांना त्रास होऊ नये म्हणून कठोर पावलं उचलली. कामाठीपुरा फक्त एक पार्श्वभूमी आहे. मी एक दोन माहितीपट बघितले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील मृत भाव काळजाला भिडणारे होते ते भूमिकेत उतरवण्याचा प्रयत्न केलाय. भूमिकेच्या तयारीबद्दल सांगायचं झालं तर मी व्हॉइस मॉड्युलेशन वर काम केलं. मी हुसेन झैदी यांचं ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ हे पुस्तक वाचलं. तसेच त्यांच्यासोबत चर्चाही केली. मी गुजराती शिकले. त्या भाषेचा लहेजा मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केलाय तसेच मुंबईच्या त्यावेळच्या बंबैय्या भाषेचा वापरही चित्रपटात आहे. त्या दोन्हीचे मिश्रण माझ्या संवादांतून दिसून येईल. बॉडी लँग्वेज बद्दल बोलायचं झालं तर ते सेटवर सीन्स करताना बरंच काही सापडत गेलं. आणि अर्थातच संजय सर तर होतेच मदतीला.”

संजय लीला भन्साली आपल्या कलाकारांकडून उत्तम काम काढून घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्याबद्दल विचारले असता ती हसत उत्तरली, “मी त्या गोष्टीशी पूर्णतः सहमत आहे. संजय सरांची काम करण्याची पद्धत एकदम निराळी आहे. त्यांना त्यांच्या कलाकारांनी भूमिकेत उतरलेलं आवडतं. आपल्या कामात मेहनत घेणे म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. ते एखादी गोष्ट समरसतेने सांगतात आणि ‘मी हा विचार तुझ्या मनात सोडला आहे. आता तो तू तुझ्या पद्धतीने अभिनयात उतरव’ असे त्यांचे मत असते. ते कधीही आग्रही नसतात की सर्वकाही त्यांच्याच पद्धतीने व्हायला हवं. ते नेहमीच कलाकारांना विश्वासात घेतात, त्यांची मतं जाणून घेतात. अगदी एक ओळ असलेल्या कलाकारांनाही त्यांची मतं विचारतात. इतका मनस्वी दिग्दर्शक विरळाच. आमच्या विचारांत समन्वयता होती आणि त्यामुळेच बऱ्याच गोष्टी न सांगताही कळत होत्या. मी मेथड ॲक्टिंग करत नाही त्यामुळे उस्फुर्त अभिनयाकडे माझा ओढा असतो. तसेच एखादी गोष्ट किंवा सीन बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने रंगविता येऊ शकतो.”

‘गंगुबाई काठियावाडी’ मध्ये अजय देवगण एका खास भूमिकेत दिसून येणार आहे. त्याच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल आलिया म्हणाली, “अजयचा रोल जरी लहान असला तरी संहितेसाठी अतिशय महत्वाचा आहे. तो करीम लाला (चित्रपटात ते नाव रहीम लाला असं आहे) वर आधारित कॅरॅक्टर मध्ये असून त्याने गंगुबाईच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका निभावली होती. अजयची नजर खूप काही बोलून जाते आणि मला ‘ती’ खूप भावते.”
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अलिकडच्या काळात आलिया भरपूर ऍड्स मधून दिसते त्याबद्दल छेडले असता आलिया दिलखुलास हसत उत्तरली, “मला भरपूर पैसे मिळतात म्हणून मी ऍड्स देखील करते. सिरियसली सांगायचं झालं तर छोट्या पडद्यावर दिसल्यामुळे मी घराघरात घुसलीय आणि त्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. आयपीएल सुरु असताना मी माझ्या स्टाफला सारखी विचारत असते ‘मेरा ऍड दिखाया के नहीं?’ आणि त्याहीपुढे जाऊन मी म्हणेन की ऍड्स केल्यामुळे माझ्या चाहत्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे.”
‘गंगुबाई काठियावाडी’ चे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचे एका शब्दात वर्णन कसे करशील यावर उत्तर देताना आलिया म्हणाली, “मॅजिक”.
हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी'च्या दिल्ली प्रमोशनमध्ये शुभ्र वस्त्रातील आलिया भट्ट