मुंबई - महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये सध्या महापुराने हाहाकार उडाला आहे. अशात पुराचे पाणी ओसरताच येथील नागरिकांसमोर नव्याने सर्व काही उभं करण्याचं आव्हान आहे. याच परिस्थितीवर आता अक्षयनं प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या परिस्थितीत तेथील नागरिकांनी धीर धरावा, असं आवाहन मी करतो. लढणं आणि पुढे जाणं आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांकडून शिकलं आहे. सरकार आणि कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन गट तुम्हाला प्रत्येक मदत करण्यासाठी तत्पर आहे, असं अक्षयनं म्हटलं आहे.
तुमचं शहर आणि जिल्हा पूर्वीपेक्षाही सुंदर बनवू, मी तुमच्यासोबत आहे, असं आश्वासनही अक्षयनं एका व्हिडिओद्वारे पूरग्रस्तांना दिलं.अक्षयचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक कलाकारही धावून येत आहेत. नुकतंच अमिताभ बच्चन यांनीदेखील आपण पुरग्रस्तांना मदत करत असल्याची माहिती ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.