मुंबई - अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "हो, आम्ही यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये 'पृथ्वीराज'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे आणि संपूर्ण टीमचे शूटिंगचे वेळापत्रक खूप छान तयार झाले आहे.'
अक्षयने 10 ऑक्टोबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून सध्या त्याच्यावर कामाचा खूपच ताण असल्याची माहिती शुटिंगशी संबंधित सूत्राने दिली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "सोनू सूदनेही १० तारखेपासून शूटिंग सुरू केले आहे. काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी टीम सतत नॉन स्टॉप काम करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षे संबंधी मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत शूटिंग सुरू आहे."
अक्षयचे सह-कलाकार संजय दत्त आणि मानुषी छिल्लरही या चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात करणार आहेत. मानुषी 13 ऑक्टोबरपासून शूटिंगमध्ये सामील होईल, तर संजय दत्त दिवाळीनंतर शूटिंगवर पुनरागमन करेल.