प्रत्येक चित्रपट आपलं नशीब घेऊन येत असतो. हिट-फ्लॉप हे चित्रपटाच्या गुणवत्तेवर ठरत असते. बऱ्याच वर्षांपूर्वी, १९७५ साली, लहान समजला जाणारा ‘जय संतोषी माता’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. म्हणजे त्याकाळी वेळोवेळी धार्मिक चित्रपट प्रदर्शित होत असत आणि ‘जय संतोषी माता’ हा त्यातीलच एक होता. कमी बजेटमध्ये बनणारे त्यासारखे चित्रपट बरा धंदा करीत. परंतु ‘जय संतोषी माता’ च्या नशिबात वेगळेच लिहिले होते. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या आजूबाजूला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना त्याचा फटका बसला. या चित्रपटाने थिएटरमध्ये ५० आठवडे मुक्काम केला होता म्हणजेच ‘गोल्डन ज्युबिली’ साजरी केली होती. ४-५ लाख रुपयांत बनलेल्या या चित्रपटाने तब्बल १ कोटीच्या वर धंदा केला. त्याकाळचे १ कोटी म्हणजे आताचे नक्कीच १०० कोटी आहेत. कमी बजेटमध्ये प्रचंड गल्ला जमविणारा तो चित्रपट तर होताच परंतु त्या चित्रपटाने लोकांच्या भावनांना हात घातला होता आणि त्यामुळेच त्याला एवढेे अफाट यश प्राप्त झाले होते.
यावर्षीसुद्धा असेच काहीसे घडले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातला आहे. मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीचा नवरा विवेक रंजन अग्निहोत्री याने ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला असून त्याला प्रेक्षकांचा अतोनात पाठिंबा मिळतोय. काश्मीरला सुबत्ता मिळवून देणाऱ्या काश्मिरी पंडितांना एका रात्रीत त्यांच्या राहत्या घरातून नेसत्या वस्त्रांनिशी काश्मीरमधून हुसकावून लावले होते ही वस्तुस्थिती आहे. मुस्लिमबहुल राज्यातून त्यांना धर्मांधतेमुळे जबरदस्तीने हाकलून देण्यात आले होते आणि ज्यांनी त्यास विरोध केला त्यांना जीवे मारण्यात आले होते. स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले आणि लहानग्यांचाही जीव घेण्यात आला. इतके सर्व होत असताना, साडेचार-पाच लाख काश्मिरी पंडित विस्थापित होत असताना, दिल्लीतील सरकार त्याकडे कानाडोळा करीत होती. या घडामोडींवर आधारित असलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ ने सर्वसामान्यांचा भावनांना साद घातलीय आणि त्यामुळेच हा चित्रपट झंझावाताप्रमाणे तिकीट बारीवर धंदा करतोय.
विवेक अग्निहोत्री च्या ‘द काश्मीर फाईल्स’ ला सुरुवातीला फक्त ६०० चित्रपटगृहे देण्यात आली होती. परंतु त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याची संख्या १५०० च्या वर गेली. त्याच्याबरोबर प्रदर्शित झालेला प्रभास चा ‘राधे श्याम’ सपशेल आपटला आणि त्याच्या झंझावातापुढे ‘बच्चन पांडे’चाही बळी गेला. आता ‘द काश्मीर फाईल्स’ चे देशभरात रोज २०००० ते २५००० शोज होत असून हा चित्रपट इतिहास निर्माण करतोय. निव्वळ १७ कोटी बजेट मध्ये बनलेला ‘द काश्मीर फाईल्स’ ३०० कोटींकडे घोडदौड करतोय. महत्वाचं म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विवेक अग्निहोत्री म्हणाला होता की, “मी हा चित्रपट पैसे कमावण्यासाठी बनविलेला नाहीये. याने १ रुपयाचा किंवा अधिक धंदा केला तरी त्याने मिळविलेला संपूर्ण नफा काश्मिरी पंडितांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी वापरला जाईल.”
हेही वाचा - युक्रेनच्या मदतीला धावल्या गीता रबारी, लोकगीतातून जमवली २.२५ कोटींची मदत