बॉलिवूड सध्या स्थित्यंतरातून जाताना दिसतोय. ‘हिरो-सेंट्रिक’ चित्रपटांपासून दूर जात आशयघन विषयांवर चित्रपट बनताना दिसताहेत. त्याचप्रमाणे हल्ली चित्रपटसृष्टीतील सितारे आपल्या भूमिकांवर आणि त्यातील लूकवर मेहनत घेताना दिसताहेत. आता अजय देवगणचंच बघाना, तो आपल्या चित्रपटांवर थोडी जास्त मेहनत घेताना दिसतो. लॉकडाऊन दरम्यान बाहेर पडताना तो मास्क वापरताना दिसला. त्याच्या मास्क आडून त्याच्या दाढीतले काळे व पांढरे केस डोकावतानाही दिसले. फोटोग्राफर्स आणि इतरांना वाटत होते की, कदाचित त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी तो तशी दाढी वाढवत असेल किंवा त्याला दाढी करण्याचाच कंटाळा आला असेल.
परंतु आता त्याचे गुपित बाहेर आले आहे. त्याने नुकतीच त्याची दाढी ‘ट्रिम’ करून घेतली असून एक अफलातून ‘सॉल्ट अँड पेपर’ लूक त्याने धारण केला आहे. या लूक-चेंज पाठी आहे प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अलीम हकीम. अजयने ‘याच लूकसाठी केला होता दाढी वाढविण्याचा आणि ती लपविण्याचा अट्टाहास’. या लूकमुळे अजयच्या पर्सनॅलिटीमध्ये मोठा फरक जाणवतोय आणि या लूकमधील त्याची व्यक्तिरेखा नक्कीच उठावदार होईल.
