मुंबई - अतोनात पावसामुळे १५-१६ वर्षांपूर्वी मुंबई बुडाली होती, तसेच अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र बुडाला होता. काही दिवसांपूर्वी कोकणासहित महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, महाड, या ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. महाराष्ट्रभरातून कोकणवासीयांना सावरण्यासाठी पूरग्रस्त भागात मदत पोहचवली जात आहे.
अनेक मराठी कलाकार मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. परंतु बहुतेक सर्वच बॉलिवूडकरांनी मदत करण्याचं मनावर घेतलेलं नाही. मात्र मुंबईकर आणि प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याने आपल्या फेसबुकवरून महाराष्ट्राला आपली गरज आहे, अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे. 'सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' या सामाजिक संस्थेबरोबर मिळून कोकणासाठी मदत करणार असल्याची माहिती त्याने या माध्यमातून दिली आहे.रायगड आणि रत्नागिरीमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. भारताचे नागरिक म्हणून आपण कोकणवासियांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, अशी भावना सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. सुनील शेट्टी ने समाज माध्यमावर पोस्ट केले की,
“आपल्या राज्याला आपली गरज आहे.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरीमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडला असून बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यातच भूस्खलनामुळेही अडचणीत भर पडत आहे. स्थानिकांनी सर्वकाही गमावले आहे. घरे १७ फूट पाण्याखाली बुडाली आहेत. शासकीय बचावकार्य सुरू आहे. मी सीएफटीआय या सामाजिक संस्थेसोबत सहकार्य करत आहे जे तळागाळातील लोकांसाठी मदतकार्य करते. महाराष्ट्रातील लोकांना आमच्या पाठिंब्याने मदत करण्याचा त्यांचा हेतू आहे. या निधी संकलनामध्ये जमा झालेला पैसा बाधित लोकांसाठी किराणा, कपडे, अन्नपदार्थ खरेदी करण्यासाठी जाईल.मी हात जोडून विनंती करतो की सर्वजण मिळून मदत करूया. प्रत्येक रुपया, प्रत्येक डॉलर महत्वाचा आहे. आता दान करा. बाधितांना आपल्या मदतीची नितांत गरज आहे. मदत पोहोचविण्यासाठी खालील नंबरांवर संपर्क साधावा. WhatsApp Amit: +919673766347Or call Ravi: +918452859069”अभिनेते सुनील शेट्टी यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल 'सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' संस्थेच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी देखील आभार व्यक्त केले आहेत. आज अस्मानी संकटामुळे कोकणवासी हतबल झाले असून त्यांचा उध्वस्त झालेला संसार पुन्हा उभा करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून पुढाकार घेणं गरजेचं आहे, असे मत चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - हनी सिंगच्या विरोधात पत्नीने दाखल केला घरगुती हिंसा, मानसिक छळ केल्याचा दावा