मुंबई - ज्येष्ठ अभिनेते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते दिनयार कॉन्ट्रेक्टर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी ५ वाजता मुंबईच्या वरळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिनयार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. पद्मश्री दिनयर कॉन्ट्रेक्टर खूप खास व्यक्ती होते, कारण ते नेहमीच सर्वांना आनंद द्यायचे. त्यांचा अभिनय सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा होता. थिएटर, सिनेमा आणि टेलिव्हीजनसारख्या सर्वच ठिकाणी त्यांनी आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या जाण्याने दुःख झाले असून आपण त्यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दिनयार यांनी बाजीगर, खिलाडी, बादशाह आणि ३६ चाइना टाउन यासारख्या अनेक चित्रपटांत महत्तवपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अनेक टीव्ही शोमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. दिनयार यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९६६ मध्ये दिनयार यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.