पूर्वी हिंदी चित्रपटातील हिरो एकाचवेळी चार-चार, पाच-पाच चित्रपटांत काम करायचे. त्यावेळी ते अभिमानाने सांगायचे की ‘मी तीन शिफ्ट्स मध्ये, तीन-चार चित्रपटांमध्ये काम करतोय’. परंतु आताच्या काळात अभिनेते-अभिनेत्री एकावेळी एकाच चित्रपटात काम करताना दिसतात. खरंतर फार वर्षांपूर्वीपासून आमिर खानने नेहमीच एकावेळी एकच चित्रपट हा मंत्र अंगिकारला होता तेव्हा फिल्म इंडस्ट्रीने त्याला वेड्यात काढले होते. आता अख्खे बॉलिवूड त्याचा ‘एकावेळी एकच चित्रपट’ हे ब्रीद वापरतेय. आमिर खानने नेहमीच उत्तम कथानकांना प्राध्यान्य दिले. ‘मेरे पिताजी हमेशा कहाँ करते थे, अगर तुम्हारी कहानी अच्छी है तो तुमको घबरानेकी जरुरत नहीं’, असे आमिरचेने सांगितले.

आमिर खान च्या ‘लगान’ ला २० वर्षे पूर्ण झालीयेत आणि त्यासंदर्भात गप्पा मारताना त्याने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदमला वरील गोष्ट सांगितली. तो पुढे म्हणाला की, ‘आशू (आशुतोष गोवारीकर) ने मला एक ‘वन-लाईन’ ऐकविली होती. ब्रिटिश राज्यांत एका गावातील लोक शेतसारा (हिंदीत लगान) देऊ शकत नव्हते तेव्हा एका गर्विष्ठ गोऱ्या अधिकाऱ्याने त्यांच्यासोबत पैज लावली की क्रिकेट मॅचमध्ये त्याच्या टीमला जर त्यांनी हरविले तर पुढच्या तीन वर्षांचा लगान माफ केला जाईल अन्यथा त्यांना ‘दुगना लगान देना पडेगा’. (हा डायलॉग ब्रिटिश ऍक्सेंटमध्ये बोलत. खरंतर एव्हाना हा एक जोकही झालाय) (आमिरने विलायती कलाकाराच्या ढंगात तो बोलूनही दाखविला). मला खरंतर ती ‘वन लाईन’ आवडली नाही आणि मी आशूला सांगितले की तूही यावर वेळ खर्च करू नकोस. साधारण तीनेक महिन्यांनी मला त्याचा फोन आला आणि त्याने मला कथा ऐकण्याची गळ घातली. मी तेव्हा त्याला असेही सांगितले की जर का ती ब्रिटिश-गावकरी गोष्ट असेल तर मला इंटरेस्ट नाहीये. परंतु त्याने ‘एकदा ऐक तरी’ असे सांगितल्यावर मी नाखुषीनेच तयार झालो.’

आमिरने पुढे सांगितले, ‘आशू ने मला ते कथानक ऐकविले आणि मी अचंबित झालो. अत्यंत प्रभावी कथानक होते आणि मला आवडलेही. परंतु याचा आवाका मोठा होता आणि चित्रपट खर्चिक आहे हे दिसत होते. मी आशूला सांगितले की ‘मी करायला तयार आहे परंतु आधी निर्माता शोध. आणि हो, कोणाही निर्मात्याला हा चित्रपट मी करतोय असे सांगू नकोस कारण मग कदाचित तो माझ्या नावामुळे निर्मितीसाठी तयार होईल.’ आशू निर्मात्याच्या शोधात फिरू लागला. मी दर तीनेक महिन्यांनी त्याची खबरबात घ्यायचो परंतु कुठलाही निर्माता तयार होत नव्हता. मी आणि आशू भेटलो की मी पुन्हा एकदा त्याला ‘नॅरेशन’ द्यायला सांगायचो. मला बघायचे होते की पुन्हा पुन्हा ऐकूनही मला स्क्रिप्ट तेव्हडीच आवडते का?’

‘दिवसांमागून दिवस जात होते, महिने जात होते परंतु निर्माता काही मिळत नव्हता. हा चित्रपट मीच का प्रोड्युस करू नये असा विचार माझ्या मनाला चाटून गेला. पण आवाका खूप मोठा होता त्यामुळे धजावत नव्हतो. रिस्क खूप मोठी होती. आणि माझ्या वडिलांचा चित्रपटनिर्मितीचा पूर्वानुभव माहित असल्यामुळे मी कधीच निर्माता न होण्याचे ठरविले होते. एकदा असाच मी विचार करीत बसलो होतो की व्ही शांताराम, के असिफ, बिमल रॉय, गुरुदत्त सारख्या (जे माझे आयडियल होते) फिल्म मेकर्सनी ‘रिस्क’ घेतली म्हणून ते उत्तमोत्तम चित्रपट निर्माण करू शकले. अर्थातच, त्यांच्याही मनात चलबिचल झाली असेल पण त्यांनी ती रिस्क घेतली. मग मी थोडा रिलॅक्स झालो आणि दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा एकदा स्टोरी सेशन ठेवले आणि त्यावेळी माझे आईवडील, माझी आधीची पत्नी रीना यांच्याबरोबर ती कथा पुन्हा ऐकली आणि त्यावेळी माझे लक्ष इतरांकडे होते की ते कसे ‘रिऍक्ट’ होताहेत. त्यावेळी माझे वडील म्हणाले की,’कथानक सुंदर आहे परंतु आवाका मोठा आहे. पण जेव्हा कथानक तगडे असते तेव्हा जास्त विचार करण्याची गरज नसते’. आणि मी आशूला माझ्या निर्मिती करण्याबाबतच्या निर्णयाची कल्पना दिली आणि ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’ चा जन्म झाला. रीनाने काहीही अनुभव नसताना निर्मितीसंदर्भातील गोष्टी उत्तमपणे सांभाळल्या होत्या. ती एक कडक आणि शिस्तबद्ध निर्माती होती आणि सगळ्यांना, अगदी मलासुद्धा, दमात घ्यायची’, आमिर खानने हसत हसत सांगितले. आमिर खान प्रॉडक्शन्सलाही २० वर्षे पूर्ण झालीयेत आणि निर्माता म्हणून आमिर खान संतुष्ट आहे.

आजच्या काळातील कोणता अभिनेता ‘भुवन’ साकारू शकेल यावर आमिर उत्तरला, ‘आताच्या जनरेशनचे कलाकार खूप टॅलेंटेड आहेत. माझ्यामते ‘भुवन’ रणबीर कपूर किंवा विकी कौशल वा रणवीर सिंग नक्कीच उत्तमपणे साकारू शकतील. जर कोणाला रिमेक बनवायचा असेल मी आणि आशू बेधडक ‘लगान’चे राईट्स देऊ.’
हेही वाचा - 'लगान'ची २० वर्षे : अजूनही आमिर खान असतो 'टीम'च्या संपर्कात