मुंबई - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला मराठी शिकवल्यामुळे चर्चेत आलेले ज्येष्ठ भाषातज्ज्ञ सुहास लिमये यांचे काल वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. आपल्या या गुरूच्या जाण्याने व्यथित झालेल्या आमिरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून खास पोस्ट लिहून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
यात आमीरने लिहिलं की, 'मला मराठी भाषा शिकवणारे सर सुहास लिमये यांचे काल निधन झाल्याची बातमी मला समजली. सर तुम्ही माझे सगळ्यात चांगले शिक्षक होतात. तुमच्यासोबत घालवलेला क्षण अन क्षण मी कधीही विसरू शकत नाही. एखादी नवीन गोष्ट शिकण्याची अथवा जाणून घेण्याची गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवत होती. चार वर्षात मी तुमच्याकडून शिकलेल्या अनेक गोष्टी कायम माझ्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. फक्त मराठीच नाही तर जगण्याशी संबंधित शिकवलेल्या अनेक गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही. तुमच्या त्या आठवणी कायम माझासोबत राहतील. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली'..
सुहास लिमये हे खरे तर संस्कृत भाषेसह मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांचे गाढे अभ्यासक होते. निवृत्तीनंतर त्यांनी सायन येथील तामिळ संघात मुंबईत राहणाऱ्या अमराठी लोकांसाठी मराठी भाषा शिकवण्याचे वर्ग विनामूल्य चालवले. कर्करोगावर मात करून त्यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा शिकवायला सुरुवात केली होती. त्यांचा विद्यार्थी वर्ग देश-परदेशात सगळीकडे विखुरलेला आहे. काही वर्षांपूर्वी आमीर खानने स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांच्याकडून मराठी भाषेचे धडे घेतले होते.