मुंबई - बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी 15 वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट टाकून त्यांनी घटस्फोट घेणार असल्याचे जाहिर केले आहे. यावरून असे दिसते, की हे जोडपे काही काळापूर्वीच विभक्त होण्याची योजना आखत होते. ते म्हणाले, की 'घटस्फोटानंतर आमचं नातं संपणार नाही, तर नवीन प्रवास सुरू होईल'. दरम्यान, घटस्फोट हा जिवनाचा शेवट नसून नवीन जीवनाची सुरुवात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

'आम्ही आमच्या चाहत्यांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळावेत, अशी विनंती करतो. आशा करतो की आमच्याप्रमाणेच तुम्हालाही हा घटस्फोट संपुष्टात आल्याचे नव्हे, तर नवीन प्रवास सुरू झाल्याचे दिसेल', असेही त्यांनी म्हटले आहे.
आमिरचा पहिला संसार टिकला 16 वर्षे

किरण रावच्या अगोदर रिना दत्ता ही आमिरची पहिली पत्नी होती. आमिर-रिनाने 1986 साली लग्न केले होते. लग्नावेळी आमिर 'कयामत से कयामत तक' सिनेमाचे शूटिंग करत होता. तर रिना शिकत होती. आमिर आणि रिना या दोघांना इरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. रिना दत्ता आणि आमिर खानचा संसार फार काळ काही टिकला नाही. 16 वर्षांनी २००२ मध्ये रिना आणि आमिर एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत वेगळे झाले. त्यामुळे आमिर-किरणचे वेगळेपण एखाद्या बाहेरील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून सुसंस्कृत असल्याचे दिसून येत असले तरी रिनासोबतचा आमिरचा घटस्फोट "क्लेशदायक" होता.
घटस्फोटानंतरही आमिर-रिनामध्ये प्रेम, आदर कायम
"मी आणि रिनाने 16 वर्षे सुखाने संसार केला. जेव्हा आमचा घटस्फोट झाला, तेव्हा ते आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी अत्यंत क्लेशदायक होते. आम्ही या परिस्थितीतही शक्य तितक्या चांगल्याप्रकारे वागण्याचा प्रयत्न केला. आमचे विभाजन झाल्यानंतरही आमच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम, आदर कायम आहे', असे आमिरने 2018 मध्ये एका चॅट शोमध्ये सांगितले होते.
रिनाचे आमिरकडून कौतुक
2017 मध्ये रिनाच्या 50 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमिर दिसला होता. तर, लगान चित्रपट प्रदर्शित होऊन नुकतेच 20 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात आमिरने रिनाचे तोंडभरून कौतुक केले होते. फिल्म प्रोड्यूसर असलेल्या रिनाचा लगान हा पहिलाच चित्रपट होता.

आमिरच नव्हे तर किरणसोबतही रिना दत्ताची चांगली मैत्री आहे. अनेकदा कामानिमित्त तिघेही एकत्र दिसून आले होते.

आमिर-किरणने 2005 मध्ये लग्न केले होते. 2011 मध्ये त्यांना सरोगसीद्वारे एक मुलगा झाला. त्याचे नाव आझाद राव खान आहे.
हेही वाचा - ‘कसौटी जिंदगी की' फेम प्राचीन चौहानला अटक, तरुणीने केला विनयभंगाचा आरोप