सॅन फ्रान्सिस्को : ट्विटरने आपल्या वरिष्ठ व्यवस्थापकासह ५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. ट्विटरने कर्मचाऱ्यांना नारळ दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ट्विटरने आपले वरिष्ठ व्यवस्थापक एस्थर क्रॉफर्ड यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे एस्थर क्रॉफर्डने ट्विटर कंपनीचे ब्लू व्हेरिफिकेशन सबस्क्रिप्शन आणि आगामी ट्विटर पेमेंट प्लॅटफॉर्मसह विविध प्रकल्पांचे नेतृत्व केले. द व्हर्जच्या वृत्तानुसार विविध विभागाताली ५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना ट्विटरने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात रिव्ह्यू न्यूजलेटर प्लॅटफॉर्मचे निर्माते मार्टिजन डी कुइजपर यांचाही समावेश आहे.
दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांना फटका : ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना काढण्याची ही चौथी वेळ आहे. मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर पुन्हा कर्मचार्यांना कामावरून कमी न करण्याचे एलन मस्क यांनी वचन दिले होते. मात्र तरीही ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या 7 हजार 500 कर्मचार्यांपैकी दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांना काढल्याचा फटका बसला आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क आणखी कर्मचार्यांना काढून टाकत असल्याचे रविवारी वृत्त आले होते. मात्र या कर्मचाऱ्यांना शनिवारीच ईमेलद्वारे नोटीस मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा सपाटा : एलन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्विटरमध्ये ७ हजार ५०० कर्मचारी कार्यरत होते. मात्र एलन मस्क यांनी या कर्मचाऱ्यांना काढण्याचा सपाटा लावला आहे. एलन मस्कने जाहिरात आणि अभियांत्रिकीसह विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीत आता 2 हजार पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच मस्कने विक्री आणि अभियांत्रिकी विभागातील डझनभर कर्मचार्यांना काढून टाकले आहे. यामध्ये एलन मस्कला थेट रिपोर्टिंग करणाऱ्या एक्झिक्युटिव्हचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा कर्ममचारी ट्विटरच्या जाहिरात व्यवसायासाठी अभियांत्रिकी विभागात कार्यरत होता.
भारतातील तीनपैकी दोन कार्यालयाला ठोकले कुलूप : ट्विटरने नुकतेच आपल्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. ट्विटरने फक्त बंगळुरू येथील कार्यालय सुरू ठेवले आहे. या कार्यालयातही फक्त अभियंत्यांनाच ठेवण्यात आले आहे. बाकी मुंबई आणि दिल्लीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याची सूचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एलन मस्कने 200 हून अधिक कर्मचार्यांना काढून टाकले होते. हे कर्मचारी भारतातील त्यांच्या कर्मचार्यांपैकी 90 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - Nokia change Logo : नोकियाने साठ वर्षानंतर बदलला आपला लोगो; आता 'या' व्यवसायावर केले लक्ष केंद्रीत