कॅलिफोर्निया [यूएस] : नासा-इस्रो द्वारे बांधण्यात येत असलेल्या (NISAR) या संयुक्त उपग्रहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. म्हणजेच भारताला रवाना होण्यासाठी आणखी काही दिवस उरले आहेत. हा उपग्रह भारताकडे यशस्वीपणे पाठवण्यासाठी शास्त्रज्ञ तयारी करत आहेत. इतकेच नाही तर शुक्रवारी कॅलिफोर्नियामध्ये शास्त्रज्ञांनी यासाठी निरोप समारंभही आयोजित केला आणि एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले.
रडारच्या क्षमतेचे एक शक्तिशाली प्रात्यक्षिक : इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, आम्ही आठ वर्षांपूर्वी या मिशनमध्ये सहभागी झालो होतो. पण आता आम्ही (NISAR) साठी कल्पना केलेली प्रचंड वैज्ञानिक क्षमता पूर्ण करण्याच्या एक पाऊल जवळ आलो आहोत. हे मिशन विज्ञान साधन म्हणून रडारच्या क्षमतेचे एक शक्तिशाली प्रात्यक्षिक असेल. तसेच आम्हाला पृथ्वीच्या गतिमान जमीन आणि बर्फाच्या पृष्ठभागाचा पूर्वीपेक्षा अधिक तपशीलवार अभ्यास करण्यास मदत करेल. (NISAR) मिशन बायोमास, नैसर्गिक धोके, समुद्र पातळी वाढ आणि भूजल यांविषयी माहिती मिळवण्यासाठी पृथ्वीची बदलणारी परिसंस्था, गतिशील पातळी आणि बर्फाचे माप मोजेल आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करेल.
सामायिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा : जेपीएलचे संचालक लॉरी लेशिन म्हणाले की, पृथ्वी ग्रह आणि आपले बदलते हवामान अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आमच्या सामायिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अभूतपूर्व अचूकतेने मोजमाप प्रदान करून, (NISAR) समुदायांमध्ये नवीन समज आणि सकारात्मक प्रभावाचे वचन देते. इस्रोसोबतचे आमचे सहकार्य हे आम्ही एकत्रितपणे गुंतागुंतीच्या आव्हानांना कसे सामोरे जातो याचे उदाहरण आहे.
रिफ्लेक्टर अँटेनासह रडार डेटा गोळा करेल : (NISAR) सुमारे 40 फूट (12 मीटर) व्यासाच्या ड्रम-आकाराच्या रिफ्लेक्टर अँटेनासह रडार डेटा गोळा करेल. ते पृथ्वीच्या जमिनीतील आणि बर्फाच्या पृष्ठभागामध्ये एक इंचाच्या खाली असलेल्या बदलांचे निरीक्षण करण्यासाठी इंटरफेरोमेट्रिक सिंथेटिक अपर्चर रडार किंवा InSAR नावाचे सिग्नल-प्रोसेसिंग तंत्र वापरेल. या समारंभाला इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ, जेपीएल संचालक लॉरी लेशिन, नासा मुख्यालयातील अनेक नामवंत शास्त्रज्ञ उपस्थित होते. या महिन्याच्या शेवटी, ते SUV-आकाराचे पेलोड एका विशेष मालवाहू कंटेनरमध्ये 9,000-मैल (14,000-किलोमीटर) उड्डाणासाठी बेंगळुरूमधील भारताच्या यु आर राव उपग्रह केंद्रात हलवतील. तेथे ते आंध्र प्रदेश राज्यातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 2024 ला प्रक्षेपित करण्याच्या तयारीसाठी स्पेसक्राफ्ट बसमध्ये विलीन केले जाईल.