नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे ओपन सोर्स डेव्हलपर प्लॅटफॉर्म गिटहब (GitHub) आर्थिक वर्षाच्या अखेरीस आपल्या 10 टक्के कर्मचार्यांना काढून टाकणार आहे. या घोषणेपूर्वी गिटहबमध्ये सुमारे 3,000 कर्मचारी होते. मात्र आता गिटहब त्याचे कार्यालये बंद करत पूर्णपणे वर्क फ्रॉम होम मोडने काम करणार आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, गिटहब मधील नवीन नियुक्त्या अजूनही फ्रीझ असतील तसेच ते आपल्या व्यवसायात देखील अनेक अंतर्गत बदल करणार आहेत.
भारतात वेगाने वाढ : कर्मचार्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये गिटहबचे सीईओ थॉमस डोहम्के म्हणाले की, प्रत्येक व्यवसायासाठी सततचा विकास महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने, यामुळे आम्हाला काही बदल करावे लागतील. आर्थिक वर्ष 2023 च्या अखेरीस गिटहब आपल्या कर्मचार्यांची संख्या 10 टक्क्यांनी कमी करेल. मी 18 जानेवारी रोजीच नव्या नोकरभरतीला स्थगिती दिली होती. गिटहब ओपन सोर्स डेव्हलपर प्लॅटफॉर्म जागतिक स्तरावर 100 दशलक्ष सदस्यांपर्यंत पोहोचले आहे. भारतातही ते मोठ्या वेगाने वाढत आहे. येथे त्याने 10 दशलक्ष डेवलपर्सचा टप्पा ओलांडला आहे. अशाप्रकारे गिटहब वर भारत हा अमेरिकेनंतर दुसरा सर्वात मोठा डेवलपर्सचा समुदाय बनला आहे.
मायक्रोसॉफ्टनेही केली कपातीची घोषणा : गेल्या महिन्यात गुगलने आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. कंपनीची आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी ही छाटणी गरजेचे असल्याचे कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले होते. त्या अगोदर मायक्रोसॉफ्टनेही 10 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. तसेच फेसबुकनेही मेटाच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
स्पॉटीफायची घोषणा : यापूर्वी म्यूझिक स्ट्रीमिंग दिग्गज स्पॉटीफायने जागतिक स्तरावर 6 टक्के कर्मचारी किंवा सुमारे 600 कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी अॅमेझाॅननेही जागतिक स्तरावर 18,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यात भारतातील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एका ट्रॅकिंग साइटवरील डेटानुसार, 2022 मध्ये, 1,000 हून अधिक कंपन्यांनी सुमारे 154,336 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे. जगभरात मंदीची लाट येणार असे निश्चित होते. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार हेही मानण्यात आले होते. आता त्याचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत.
हेही वाचा : Zoom Lay Off : झूम 1,300 कर्मचार्यांना काढून टाकणार, सीईओ एरिक युआन यांची 98 टक्के वेतन कपात