इंफाळ : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता राज्यातून आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. काकचिंग जिल्ह्यात सशस्त्र बदमाशांनी एका स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय विधवेला तिच्या घरात कोंडून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. सेरू पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार, या महिलेला बदमाशांनी 28 मे रोजी राजधानी इंफाळपासून 48 किमी अंतरावर असलेल्या सेरू गावात तिच्या घरात कोंडून पेटवून दिले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आर्मीचे सदस्य होते : मैतेई समाजाच्या एस. इबेतोम्बी माबी ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले एस. चुरचंद सिंह यांच्या पत्नी होत्या. एस. चुरचंद सिंह यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. चुरचंद सिंग हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीचे सदस्य होते. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. तर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने त्यांना एप्रिल 1997 मध्ये नेताजी पुरस्कार दिला होता.
बदमाशांनी घर पेटवले : इबेतोम्बी माबी यांची सून एस. तंपकसाना म्हणाली की, 'जेव्हा आमच्या घरावर शस्त्रधारी बदमाशांनी हल्ला केला तेव्हा माझ्या सासूने मला तेथून पळून जाण्यास सांगितले. त्यांना म्हातारपणामुळे धावता येत नव्हते. मी आणि शेजारची तीन कुटुंबे तेथून पळून गेलो'. काही तासांनंतर तिने इबेतोम्बी माबींचे नातेवाईक प्रेमकांत मेइती यांना त्यांची सुटका करण्यास सांगितले. मेइतीने सांगितले की, 'जेव्हा तो इतर काही लोकांसह घटनास्थळी पोहोचला तेव्हा आगीने संपूर्ण घराला वेढले होते. तर वृद्ध महिला जळून मरण पावली होती. हल्लेखोरांनी पुन्हा गोळीबार सुरू केल्याने त्यांनाही तेथून तात्काळ पळ काढावा लागला'.
जळून मृत्यू झाला : 28 मे च्या या घटनेवर तंपकसाना म्हणाली की, या हल्ल्यामुळे ती घाबरली होती. त्यानंतर तिने स्थानिक आमदाराच्या घरी आश्रय घेतला. तंपकसाना म्हणाली की, 'मी प्रेमकांत मेइती यांना माझ्या सासूला वाचवण्यासाठी घटनास्थळी जाण्यास सांगितले. पण जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा सर्व काही संपले होते. राख आणि ढिगारा व्यतिरिक्त फक्त एका वृद्ध महिलेचे अवशेष दिसत होते, जिचा जळून मृत्यू झाला होता.'
सेरू गाव सर्वाधिक प्रभावित : मणिपुरातील सेरू हे गाव जातीय हिंसाचारात सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांपैकी एक असलेल्या प्रदेशात स्थित आहे. गावापासून थोड्याच अंतरावर असलेली स्थानिक सेरू गावची बाजारपेठ आता सुनसान झाली आहे. गावात राहणारे सर्व स्थानिक व्यापारी तेथून पळून गेले आहेत. त्यांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यामुळे परिसर ओसाड झाला आहे.
हेही वाचा :