नवी दिल्ली : ओपन एआय हे मानवतेसाठी घातक असल्याबाबतचे पत्र एलन मस्क यांच्यासह अनेक उद्योजकांनी दिले आहे. मात्र या वादात आता इटलीनेही उडी घेतली आहे. इटलीच्या वापरकर्त्यांच्या डेटावर प्रक्रिया करणे थांबवा अन्यथा दंड ठोठावणार असल्याचा इशारा इटलीचे रेग्युलेटर गारंटे यांच्याकडून देण्यात आला आहे. चॅट जीपीटी निर्माते युरोपियन युनियनच्या (EU) जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशनचे (GDPR) उल्लंघन करत असल्याची चिंता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबाबतची चौकशी सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
20 दशलक्ष युरोचा दंड : इटलीने मायक्रोसॉफ्टच्या ओपन एआयला याबाबतचे आदेश बजावले आहेत. ओपनएआय ऑर्डरचे पालन करण्यासाठी लागू केलेल्या उपायांच्या 20 दिवसांच्या आत इटालियन नियामकांना सूचित करावे लागणार आहे. अन्यथा 20 दशलक्ष युरो किंवा एकूण जगभरातील वार्षिक उलाढालीच्या 4 टक्के दंड आकारला जाणार असल्याचेही इटलीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. चॅट जीपीटीने गोपनीयतेच्या कायद्यांचे उल्लंघन करून डेटावर प्रक्रिया करणे सुरू ठेवण्याचा आता कोणताही मार्ग नाही. इटालियन एसएने प्लॅटफॉर्म विकसित करणारी यूएस आधारित कंपनी ओपन एआयद्वारे इटालियन वापरकर्त्यांच्या डेटावर प्रक्रिया करण्यावर तात्पुरती मर्यादा लादली आहे. या प्रकरणातील चौकशी आणि तथ्ये तपासण्यास सुरुवात केल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले आहे.
पेमेंट माहिती उघड : मायक्रोसॉफ्ट कंपनीने ओपन एआय चॅट जीपीटीच्या ग्राहकांच्या पेमेंटची माहिती उघड झाल्याची कबुली दिली होती. वापरकर्त्यांची पेमेंट हिस्ट्री इतर ग्राहकांना दिसल्याने ओपन एआयने बग आल्याचे जाहीर करत चॅट जीपीटी ऑफलाईन करण्यात आले होते. त्यामुळे इटलीचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. ओपन एआय ही ईयू ( EU ) मध्ये स्थापना केलेली कायदेशीर संस्था नाही. कोणताही डेटा संरक्षण प्राधिकरण स्थानिक वापरकर्त्यांना धोका असल्यास GDPR अंतर्गत हस्तक्षेप करू शकतो असेही इटलीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र इटलीने दिलेल्या आदेशाला अद्याप ओपन एआयने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Elon Musk News : मानवतेला घातक एआय थांबवा... एलॉन मस्कसह 100हून अधिक उद्योजकांचे प्रयोगशाळांना पत्र