नवी दिल्ली : सध्या टेक जगतात चॅट जीपीटीची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता गुगलनेही आपल्या बार्ड नावाच्या एआय चॅटबोटला प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. मात्र बार्ड चॅटबोटला प्रशिक्षण देण्यासाठी गुगल चॅट जीपीटीची कॉपी करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. या आरोपाला गुगलने फेटाळले आहे. ओपन एआयच्या ( Open AI ) च्या यशाने गुगलच्या अल्फाबेट ( Alphabet ) मधील दोन एआय संशोधन संस्थांना एकत्र काम करण्यासाठी भाग पाडल्याचा दावा द इन्फॉर्मेशनमधील अहवालात करण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी विकसित केले सॉफ्टवेअर : ओपन एआयने मिळवलेल्या यशामुळे अनेक वाद वाढत आहेत. त्यामुळे गुगलही ओपन एआयसोबत स्पर्धा करण्यासाठी बार्ड हे एआय विकसित करत आहे. गुगलच्या एआय समूहातील सॉफ्टवेअर अभियंते ओपन एआयसोबत स्पर्धा करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी काम करत आहेत. दीपमाईंड या कंपनीतील कर्मचाऱ्यांचाही यात समावेश असून ती अल्फाबेटमधील एक कंपनी आहे. गुगलने बार्ड तयार करताना अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे. त्यामुळे अडखळल्यानंतर ओपन एआयच्या चॅटबोटशी स्पर्धा करण्यासाठी गुगलकडून संयुक्त प्रयत्न सुरू झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
डेटावर दिले जात नाही प्रशिक्षण : चॅट जीपीटीची कॉपी केल्याचा आरोप गुगलवर झाल्यानंतर याबाबत चांगलाच वाद रंगला. त्यामुळे बार्डला चॅट जीपीटीच्या कोणत्याही डेटावर प्रशिक्षण दिले जात नसल्याची माहिती गुगलच्या प्रवक्त्याने द व्हर्जला दिली. गुगलने तयार केलेल्या बार्ड या चॅट बोटमध्ये अमेरिका आणि यूकेमध्ये प्रारंभिक नोंदणी सुरू झाल्याची माहितीही या प्रवक्त्याने दिली आहे. त्यानंतर आता गुगलचे चॅट बोट इतर देशात आणि भाषातही प्रवेश करणार असल्याचे या प्रवक्त्याने जाहीर केले आहे. ओपन एआयच्या चॅट जीपीटी आणि मायक्रोसॉफ्टच्या बिंग चॅटबोट प्रमाणे बार्ड मोठ्या भाषेच्या मॉडेलवर (LLM) आधारित आहे.
हेही वाचा - Elon Musk News : मानवतेला घातक एआय थांबवा... एलॉन मस्कसह 100हून अधिक उद्योजकांचे प्रयोगशाळांना पत्र