बिजनेस डेस्क - इलेक्ट्रिक कारमेकर दिग्गज कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क हे नाव ऐकले नसेल, अशी व्यक्ती शोधूनही सापडणे मुश्किल आहे. भारतीय बाजारपेठेत टेस्ला कार पुढच्या वर्षी ( जानेवारी - 2021) लाँच करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते, अशी माहिती मस्क यांनी दिली होती. एका ट्विटसंबंधी प्रतिक्रिया देताना त्यांनी याबद्दल सांगितले होते.
टेस्ला कल्ब इंडियाने केलेल्या एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना मस्क म्हणाले, की जानेवारी महिन्यात टेस्ला संभाव्यरित्या भारतीय बाजारपेठेच्या ऑर्डरसाठी तयार असणार आहे. एका फॉलोवरने त्यांना प्रश्न केला, की जानेवारी 2021 मध्ये टेस्ला भारतात येणार ?, यावर मस्क म्हणाले, की सध्या खात्रीशीरपणे सांगता येणार नाही, मात्र निश्चितच यावर्षी टेस्ला इंडियन रोडवर दिसण्याची शक्यता आहे.
मंगळवारी इंडियन एक्सप्रेसला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुलाखत दिली होती. यावेळी ते म्हणाले, की टेस्ला 2021 च्या प्रारंभीस आपल्या कामकाजास सुरुवात करेल. त्यानंतर संभवत: देशात वाहनांची असेम्ब्लिंग व निर्मितीवर लक्ष केंद्रित करणार. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताच्या कार्यक्रमांतर्गत व्होकल फॉर लोकल ही मोहीम राबवली आहे. त्यांचे हे स्वप्न साकार करण्याच्या निमित्ताने भारतात टेस्लाचे प्लान्ट उभारण्यात येण्याची घोषणा होऊ शकते का किंवा काही अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येऊ शकतील का ( उदाहरणार्थ : शांघायमधील टेस्लाची गीगाफॅक्टरी) हे अद्याप स्पष्ट नाही.
पूर्वी अनेकप्रसंगी मस्क यांनी खुलासा केला, की ते टेस्ला ब्रांडला भारतात आणू इच्छित आहेत. मात्र, सन् 2018 ला एका ट्विटर पोस्टमध्ये ते म्हणाले, की सरकारचे गुंतवणुकीसंबंधी नियम आव्हानात्मक व कठोर आहेत. त्यामुळे या निर्णयाला प्रत्यक्षात अंमलात आणण्यास अनेक अडचणी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.