सॅन फ्रान्सिस्को- टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी प्रदुषणाची तीव्रता कमी करण्यासाठी अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे. कार्बन काढून टाकण्यासाठी संशोधन करणाऱ्या व्यक्तीला मस्क यांच्या न्यू एक्सप्राईज फाउंडेशनकडून १० कोटी डॉलरचे बक्षीस देण्यात येणार आहे.
टेस्लाचे सीईओ यांनी कार्बन काढून टाकण्याची स्पर्धा आज सकाळी जाहीर केली आहे. ही स्पर्धा चार वर्षे सुरू राहणार आहे. जगभरातील सर्व गटांसाठी ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा-नवीन उच्चांक गाठून शेअर बाजार निर्देशांकात दिवसाखेर अंशत: घसरण
- येत्या दीड वर्षात कार्बन काढून टाकण्याच्या स्पर्धेत १५ गटांची निवड करण्यात येणार आहे. त्यांना प्रत्येकी १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस देण्यात आहे.
- याचबरोबर विद्यार्थ्यांच्या २५ गटांना स्वतंत्रपणे २ लाख डॉलरची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
- स्पर्धेतील सर्वोत्तम विजेत्याला ५ कोटी डॉलरचे बक्षीस देण्यात येणार आहे.
- दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला २० दशलक्ष डॉलर तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला १० दशलक्ष डॉलरचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे अमेरिकेतील एका माध्यमाने म्हटले आहे.
हेही वाचा-सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक संघटना करणार दोन दिवसीय संप
काय म्हटले आहे एलॉन मस्कने?
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क म्हणाले की, आम्हाला खरोखर अर्थपूर्ण परिणाम घडवून आणायचा आहे. कार्बन कमी करणे नव्हे, तर कार्बन निष्प्रभ करणे हा हेतू आहे. ही लेखी स्पर्धा नाही. आमच्या टीमने प्रत्यक्षातील व्यवस्था करावी, अशी आमची इच्छा आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड काढणे शक्य असल्याचे विजेत्यांना दाखवावे लागणार आहे.
दरम्यान, एलॉन मस्क यांनी जानेवारीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांना जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत मागे टाकले आहे. त्यानंतर मस्क यांनी कार्बनवरील संशोधनासाठी मोठे बक्षीस जाहीर केले आहे. याची ट्विटरसह, टेस्लाच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. मस्क यांच्याकडून देण्यात येणारे १० कोटी डॉलरचे बक्षीस मस्क हे त्यांच्या स्वत:च्या फाउंडेशनकडून देण्यात येणार आहे.