हैदराबाद : देशात कोरोना मृतांची संख्या वाढतच चालल्याने, याचा प्रचंड ताण देशाभरातील स्मशानभूमी आणि दफनभूमींवर आला आहे. यापूर्वी कधीही अशाप्रकारचा ताण स्मशानभूमी आणि दफनभूमींनी अनुभवला नव्हता. या वाढत्या ताणामुळे कोरोना विरुद्धची लढाई कमकुवत बनत चालली आहे. देशातील मृतांचा वाढता आकडा लक्षाच घेऊन, प्रशासनाकडून नवीन तात्पुरत्या स्वरुपाच्या स्मशानभूमी स्थापन केल्या जात आहेत. याचबरोबर सध्या अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमी योग्य प्रकारे कार्यरत राहवे, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. परंतु भारतात स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांचे संरक्षण आणि मृतांना सन्मानपूर्वक निरोप दिला जात आहे का?
- मृतांच्या कुटुंबीयांसमोर स्मशानभूमीत प्रतीक्षा करण्याच्या कालावधीव्यतिरिक्त, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिकांमधून मृतदेह थेट स्मशानभूमीत हलवावे लागत असल्याने रुग्णवाहिका या तात्पुरत्या स्वरुपाच्या मर्च्युरीज (जिथे मृतदेह साठवून ठेवतात अशी खोली) बनल्या आहेत.
- कोविड-१९ रूग्णांचे मृतदेह हाताळण्यासंबंधीचे धोरण व मार्गदर्शक सूचना वेळोवेळी बदलत राहिल्यामुळे डॉक्टर, रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांच्या कुटूंबात संभ्रम वाढत आहे. या अगोदर कोविड-१९ संशयीत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास रुग्णालयांनी मनाई केली होती. याउलट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधीची मार्गदर्शक सूचना मात्र शिथिल केली आहे. आतापासून, कुटुंबीयांना मृतदेह मिळवण्यासाठी प्रयोगशाळेच्या पुष्टीकरणाची प्रतीक्षा करावी लागणार नाही.
भारतातील विविध राज्यांत मृतदेह कशाप्रकारे हाताळले जात आहेत ?
दिल्ली
- देशाची राजधानी दिल्लीत एकूण १३ स्मशानभूमी आणि चार दफनभूमी (कबरस्तान) आहेत, ज्याचे कामकाज नागरी संस्थांकडून केले जात आहे. यापैकी सहा स्मशानभूमी आणि चार दफनभूमी कोरोना संशयित किंवा पुष्टी झालेल्या कोविड-१९ रुग्णांसाठी वापरण्यात येत आहेत.
- कोविड-१९ च्या प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कारासाठी मंगोलपुरी, इंदर पुरी, बेरी वाला बाग, वजीरपूर, सीमापुरी आणि गाजीपूर स्मशानभूमी अशा सहा नवीन ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
- दिल्लीतील तीन महानगरपालिका (दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि उत्तर दिल्ली) यांनी संयुक्तपणे एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोविड-१९ मृतांची वाढती संख्या लक्षात घेता, महानगरपालिकांने एकत्रितपणे त्यांच्या स्मशानभूमींची क्षमता वाढवली आहे. यामुळे आता एका दिवसाला ९५ ते १०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतील. यापूर्वी या तीन महानगरपालिकांच्या हद्दीतील स्मशानभूमीत दररोज केवळ ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येत होते.
- एसडीएमसी, पूर्व दिल्ली महानगरपालिका आणि उत्तर दिल्ली महानगरपालिका या तीनही महानगरपालिकांद्वारे पंजाबी बाग, निगमबोध घाट, पंचकुईयन रोड आणि करकरदूमा येथील स्मशानभूमींत आणि लोधी रोड येथील विद्युत स्मशानभूमीत कोविड-१९ मृतांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संबंधित स्मशानभूमींची क्षमताही वाढवण्यात आली आहे. ही क्षमता अनुक्रमे २०-२२; १५-१६; ०८-१०; ०६-०८ आणि ०५-०६ अशी वाढवली आहे.
- कोविड-१९ मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी सरण सुविधेला परवानगी दिल्याने प्रतिदिन ९५ ते १०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येऊ लागले आहेत. यापूर्वी दिवसाला केवळ ४५ मृतदेहांवरच अंत्यसंस्कार करता येत होते. या सुविधांव्यतिरिक्त महानगरपालिकेच्या हद्दीत चार दफनभूमी आणि एक ख्रिश्चन दफनभूमीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- दिल्लीतील कोविडशी संबंधित पाच स्मशानभूमींमध्ये पंजाबी बाग येथे एक लाकडी सरण रचून किंवा सीएनजी / इलेक्ट्रिक अशा दोन्ही प्रकारे अंत्यसंस्कारांचे आयोजन करता येते. याठिकाणी २७ मे ते ७ जून दरम्यान एकूण ४८० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजेच दिवसाला सरासरी ४० मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र
- मुंबईमध्ये बीएमसीकडून चालवली जाणारी ४९ आणि २० खासगी स्मशानभूमी आहेत. संपूर्ण मुंबईसाठी बीएमसीने ४६ स्मशानभूमींची यादी करुन त्याचा डॅशबोर्ड तयार केला आहे. शिवाय कोविड रूग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी एसओपीही देण्यात येत आहे. त्याचबरोबर हिंदू इलेक्ट्रिक स्मशानभूमी आवारात तात्पुरत्या स्वरुपाची एकूण १५ मुडदा घरं उभारण्यासाठी बीएमसीने एक टेंडरही जारी केले आहे. भांडुप येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमीत एप्रिल २०१९ ते मार्च २०२० दरम्यान एकूण १४४ अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परंतु यावर्षी केवळ मे महिन्यातच याठिकाणी ११५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये ८९ मृतदेह हे केवळ कोविड-१९ बाधित होते.
पश्मिम बंगाल
- कोविड-१९ मुळे मृत पावलेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या धापा स्मशानभूमीत आणखी दोन इलेक्ट्रिक दहन सुविधा उभारण्याचे काम कोलकाता महानगरपालिकेने सुरू केले. कोलकाता महानगरपालिकेने अंत्यसंस्कारांसाठी शहरात आणखी दोन स्मशानभूमी आणि दफनभूमी आरक्षित ठेवल्या आहेत.
कर्नाटक
- कर्नाटक सरकारने कोविड-१९ मुळे मृत झालेल्यांसाठी स्मशानभूमी फी माफ केली आहे. याचा सर्व खर्च ब्रुहार बेंगलुरू महानगर पालिकेकडून (बीबीएमपी) केला जाणार आहे. ब्रुहार बेंगलुरू महानगर पालिकेने (बीबीएमपी) कोविड-१९ च्या मृतांसाठी चार स्मशानभूमी राखीव ठेवल्या आहेत. तसेच मृतांची वाढती संख्या लक्षात घेता बीबीएमपीने इलेक्ट्रिक स्मशानभूमीच्या कामकाजाची वेळ सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत वाढवली आहे. कारण मृतदेह घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेची वाट पाहत स्मशानभूमी बाहेर रांगा लावणे, ही नित्याची बाब बनली आहे.
- बीबीएमपीने राजराजेश्वरीनगर (केंगेरी), येलहांका (मेडी अग्रहारा), महादेवपुरा (कुडलु) आणि बोम्मनहल्ली (पानाथुर) येथील प्रत्येकी एक स्मशानभूमी कोविड-१९ मृतांसाठी राखीव ठेवली आहे. याठिकाणी कोविड संसर्ग टाळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बीबीएमपीने असेही म्हटले आहे की, मृतदेह वाहतूक करण्यासाठी वापरलेली वाहने, स्मशानभूमी परिसर आणि मृतदेह आणण्यासाठी वापरलेली विविध साहित्य निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अंत्यविधी राबवणाऱ्या कर्मचार्यांनी पीपीई कीट वापरणे बंधनकारक केले आहे.
अंत्यविधीसाठी तंत्रज्ञानाचा वापर..
- इलेक्ट्रीक मशीनमुळे अंत्यविधीच्या पारंपरिक पद्धती बदलत आहेत. हिंदू परंपरेनुसार मृत व्यक्तींना लाकडी सरणावर ठेवून जाळले जाते. तत्पूर्वी कुटुंबातील सदस्य पुजाऱ्यांकडून विविध धार्मिक विधी करून घेत असत. परंतु कोविड-१९ मुळे हे सर्व बदलल्याचे पाहायला मिळत आहे. स्मशानभूमीत अशा प्रकारचे शक्य तेवढे विधी पाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र स्मशानभूमीवरील वाढत्या ताणामुळे विद्युत दफन भट्टीने अशाप्रकारची पारंपरिक अंत्यविधी प्रक्रिया पार बदलून टाकली आहे. एखाद्या मृत रुग्णांचे कोणीही नातेवाईक उपस्थित नसताना किंवा फक्त एकाच नातेवाईकासमोर स्मशानभूमीतील कामगारांद्वारे धार्मिक विधी संपन्न केले जात आहेत.
- दुसरीकडे इस्लामच्या परंपरेनुसार मृतांसाठी कबर खणली जाते. परंतु कोविड-१९ दरम्यान, कबर व्यक्तींकडून खोदण्याऐवजी अर्थमुव्हर्सचा (जेसीबी) वापर केला जात आहे. मृतादेहाचे वेळेवर दफन करण्यासाठी, दफनभूमीतील कामगार कबर खोदण्यासाठी मशीन्स वापरले जात आहे. ज्यामुळे काही मिनिटातच कबर खोदली जात आहे. यामुळे बराच वेळ वाचत आहे.
- त्याचबरोबर भारतात कोरोना साथीच्या काळात बरेच अॅप्स सुरु झाले आहेत. ज्यामध्ये धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी पुरोहितांच्या सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध करुन दिल्या आहेत. शिवाय अंत्यसंस्कारांचे आयोजनही करुन दिले जात आहे, यासाठी मृतांच्या कुटुंबीयांना घराच्या बाहेर पडण्याचीही आवश्यकताही पडत नाही. तसेच अंत्यसंस्काराच्या आयोजनासोबत मृत्यूचे दाखले आणि इतर सर्व काही सुविधाही पुरवल्या जात आहेत. ज्यामध्ये शवपेटीका, तिरडी आणण्यापासून स्मशानभूमीचा पास उपलब्ध करेपर्यंत सर्व बाबींचा समावेश आहे. तर काही वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही पूजा आयोजित केली जात आहे.
समस्या..
- स्मशानभूमी आणि दफनभूमीतील कामगारांना पीपीई किट दिली जात नाहीत.
- कोविड-१९ साथीच्या रोगाची बाधा होण्याची भीती आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे कर्मचार्यांची कमतरता आहे.
- अंत्यविधी किंवा दफनविधीवर देखरेखीचा अभाव आहे.
- नातेवाईक आणि रुग्णालये मृतदेह अर्धवट सोडून देत आहेत.
- कोविड-१९ मुळे मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने मृतदेहांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही.
- योग्य संरक्षणाशिवाय अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने जमणाऱ्या नातेवाईकांमुळे कोविड-१९ च्या प्रसारात आणखी वाढ होत आहे.
- मृताचे अंत्यसंस्कार किंवा दफनविधी करण्यासाठीच्या लांबच्या-लांब रांगा लागत आहेत.
- लोकांमध्ये जागरूकता नसल्याने अतार्किक भीती निर्माण होत आहे. ज्यामुळे मृतदेह कुठेही सोडून दिली जात आहेत. त्यामुळे संबंधित सर्व प्रक्रिया विस्कळीत होत आहे.