हैदराबाद : कोविड-१९च्या साथीला सुरुवात झाल्यापासून पुढील नऊ महिन्यांमध्ये ११.६ नवीन जीव जन्माला येणे अपेक्षित असून गर्भवती महिला आणि नवजात बालकांना जीवन सुरक्षा पुरविण्यासाठी सरकार आणि दानशुरांनी पुढे येण्याचे आवाहन युनिसेफने केले आहे.
"नवीन माता आणि नवजात शिशुंना लॉकडाउन आणि संचार बंदीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. आरोग्य केंद्रे कोविड रुग्णांना उपचार देण्यात व्यस्त असतील, वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवेल, आरोग्य कर्मचारी आणि मदतनीस कोविड रुग्णांना सेवा देण्यात मग्न असतील अशावेळी प्रसूती करणाऱ्या कुशल सेविकांचा अभाव असेल असे युनिसेफने म्हटले आहे.
साथीच्या रोगाचा प्रसार झाल्यापासून नऊ महिन्यांमध्ये सर्वाधिक नवजात बालकांचा जन्म अपेक्षित असलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पहिला आहे. भारतात २.०१ कोटी नवीन जीव जन्माला येण्याचा अंदाज आहे. त्याखालोखाल चीन (१.३५ कोटी), नायजेरिया (६४ लाख), पाकिस्तान (५० लाख) आणि इंडोनेशियाचा (४० लाख) नंबर लागतो. यापैकी बहुतेक देशांमध्ये साथीच्या रोगाचा प्रसार होण्यापूर्वीदेखील नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण खूप होते. आता कोविड १९ मुळे त्यात आणखी वाढ होऊ शकते.
श्रीमंत देशदेखील या संकटाने त्रस्त आहेत. ११ मार्च ते १६ डिसेंबर या कालावधीत अमेरिकेत ३३ लाखांहून अधिक अधिक नवजात बालकांचा जन्म होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रुग्णालयात मुलांना जन्म देण्याबाबत गर्भवती महिला काळजीत असल्याने न्यूयॉर्क प्रशासन प्रसूती केंद्रांना नवीन पर्याय शोधत आहे.
कोविड १९ची बाधा झालेल्यांमध्ये गर्भवती मातांचे प्रमाण कमी असले तरी देखील देशांनी प्रसूतीपूर्व, प्रसूती व नंतरच्या सेवा पुरविण्यासाठी सुसज्ज राहण्याची चेतावणी युनिसेफने दिली आहे. त्याचप्रमाणे, आजारी नवजात बालकांना मृत्यूचा धोका जास्त असल्याने आपत्कालीन सेवांची आवश्यकता असते. याशिवाय नवीन कुटुंबांना स्तनपान सुरू करण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना निरोगी ठेवण्यासाठी औषधे, लस आणि पोषण मिळविण्यासाठी आधार देण्याची गरज असल्याचे देखील युनिसेफने म्हटले आहे.
हेही वाचा : कोरोना चाचणीसाठी इंग्लंडने अमेरिकेला पाठवले ५० हजार नमुने...