हैदराबाद : कोविड-19 महामारीचा लठ्ठ लोकांवर लक्षणीय परिणाम होत आहे, कारण यामुळे त्यांना आपले वजन आणि मानसिक आरोग्य सांभाळणे कठीण जात आहे, असे संशोधकांना आढळून आले आहे.
क्लिनिकल ओबेसिटी या नियतकालिकात हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला. याअंतर्गत, वजन व्यवस्थापन करणाऱ्या 123 रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून असा निष्कर्ष पुढे आला की, 73 टक्के रुग्णांनी आपली अस्वस्थता वाढत असल्याचे अनुभवले आणि सुमारे 84 टक्क्यांमध्ये नैराश्य वाढले होते.
"संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सर्वांना घरी राहण्यास सांगण्यात आले होते. विशेषतः अधिक प्रमाणात लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी हे महत्त्वाचे होते. कारण, त्यांच्या तब्येतीसंदर्भात गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आणि कोरोना विषाणूमुळे मृत्यूचा धोका अधिक आहे", असे अमेरिकेतील ह्युस्टन येथील टेक्सास विद्यापीठातील अभ्यासक सारा मेसिआह यांनी सांगितले. मेसिआह या संशोधन अभ्यासाच्या लेखक आहेत.
15 एप्रिल ते 31 मे दरम्यान आयोजित ऑनलाईन प्रश्नावलीतून या अभ्यासासाठी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. सहभागी लोकांचे सरासरी वय 51 होते आणि महिलांचे प्रमाण 87 टक्के होते. या सर्व रुग्णांचा सरासरी बॉडी मास इंडेक्स 40 होता.
सुमारे 70 टक्के लोकांनी वजन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, 48 टक्के लोकांनी व्यायामासाठी कमी वेळ मिळत असल्याचे सांगितले. याशिवाय, 56 टक्के लोकांमध्ये व्यायामाबाबत कमी तीव्रता होती. निम्म्या रुग्णांमध्ये अन्न साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढले आणि 61 टक्के लोकांमध्ये भूक नसतानाही खाण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले.
संशोधकांच्या मते, दोन रुग्णांची सार्स-कोविड-2 ची चाचणी सकारात्मक आली. मात्र, 15 टक्के रुग्णांमध्ये विषाणूची लक्षणे आढळून आली. सुमारे 10 टक्के रुग्णांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आणि 20 टक्के रुग्णांनी सांगितले की त्यांना समतोल आहार घेणे परवडत नाही.
"या अभ्यासाचे प्रमुख बलस्थान असे आहे की, कोविड-19 महामारीमुळे लठ्ठपणा असणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यावर कसा परिणाम झाला आहे, हे सांगणाऱ्या माहितीवर आधारलेल्या पहिल्यावहिल्या मोजक्या अभ्यासांमध्ये याचा समावेश आहे", असे वक्तव्य अभ्यास संशोधक जेम अॅलमँडोझ यांनी केले.
अॅलमँडोझ यांनी असे निरीक्षण नोंदवले की, लठ्ठपणा असणाऱ्या अनेक रुग्णांना आधीच योग्य प्रकारचे ताजे, आरोग्याला पोषक असे अन्न मिळवण्यात अडचणी येतात. काही लोक किराणा दुकानांचा अभाव असणाऱ्या भागांमध्ये राहतात. अशा ठिकाणी केवळ फास्ट फूड आणि प्रोसेस्ड अन्नाचा पर्याय शिल्लक राहतो.
"मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाशी संबंधित इतर समस्यांमुळे गरजांचा मोठा अनुशेष तयार होईल जो आपल्याला घाबरवण्यासाठी परत येईल", असे अॅलमँडोझ म्हणाले.
"जेव्हा सोशल आयसोलेशन सह नोकरी आणि विमा संरक्षणाचा अभाव यासारखे अडथळे समोर येतात, संभाव्य आपत्ती येऊ घातलेली असते", असे संशोधकांनी म्हटले आहे.
संशोधकांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या अभ्यासातून चिकित्सक आणि इतर आरोग्य व्यावसायिकांसाठी लठ्ठ प्रौढांवर कोविड-19 मुळे होणारे शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबतचे परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी धोरण उपलब्ध होऊ शकते.
दी बीएमजे नियतकालिकात गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या आणखी एका अभ्यासात असे समोर आले आहे की, गंभीर स्वरुपाचा कोविड-19 किंवा मृत्यू होण्यात वय, मेल सेक्स, लठ्ठपणा आणि मूलभूत आजार हे काही प्रमुख घटक म्हणून समोर येत आहेत.
हेही वाचा : कोविड-१९चा रेणू शोधण्यात इस्रायली संशोधकांना यश; लस विकसित करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल..