राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा दिवस 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात साजरा केला जातो. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याची सुरूवात 1985 साली झाली. भारतात नेत्रदानाबद्दल जनजागृती करणे आणि वंचितांकडे लोकांचे लक्ष वेधणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. अंधत्वाची अनेक कारणे असू शकतात. जसे की मोतीबिंदू, अपवर्तक त्रुटी, काचबिंदू, वय-संबंधित मॅक्युलर डीजनरेसशन, मधुमेह रेटिनोपॅथी आणि कॉर्नियल (बुबुळाचा विकार) अंधत्व. त्यापैकी जगभराचा विचार करता अंधत्व येण्यामागे बुबुळाचा विकार हे चौथे प्रमुख कारण आहे.
राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा उद्दिष्ट -
- मृत्यूनंतर नेत्र दान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे.
- मृत्यूनंतर नेत्रदान केल्याने कोणतीही हानी होत नाही, याबद्दल लोकांना जागृत करणे.
- नेत्र प्रत्यारोपणाच्या आवश्यकतेबद्दल प्रसार करणे.
नेत्रदानाबद्दलची काही तथ्ये -
- व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरच डोळे दान करता येतात. मृत्यू झाल्यानंतर 4 ते 6 तासांच्या आत फक्त
- नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडूनच डोळे काढले पाहिजेत.
- डोळे काढण्यासाठी आय बँक / नेत्रपेढी टीमने / चमूने मृताच्या घरी किंवा रुग्णालयात भेट देणे आवश्यक आहे.
- डोळा काढून घेण्याची प्रक्रिया फक्त 20 ते 30 मिनिटात पार पडत असल्याने अंत्यसंस्कारात व्यत्यय किंवा उशीर होत नाही.
- डोळे काढताना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, म्हणून थोड्या प्रमाणात रक्त घेतले जाते.
- डोळे काढून टाकल्यामुळे विघटन होत नाही. तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाही. तसेच, नेत्रदान करणारा आणि प्राप्तकर्ता या दोघांचीही ओळख गोपनीय ठेवली जाते.
'यांना' नेत्रदान करता येत नाही -
एड्स, हिपॅटायटीस बी आणि सी, रेबीज, सेप्टीसीमिया, अक्यूट ल्यूकेमिया, टिटॅनस, कॉलरा आणि एन्सेफलायटीस आणि मेंदुच्या वेष्टनासारखा संसर्गजन्य आजाराने ग्रस्त व्यक्तीला नेत्रदान करता येत नाही.
नेत्रदानाच्या अभावाची कारणे -
प्रचलित गैरसमज आणि याविषयी लोकांमध्ये असलेली अनभिज्ञता आणि नेत्रपेढीच्या सुसज्जतेचा अभाव
ही नेत्रदान करणाऱ्यांची संख्या कमी असण्याची मुख्य कारणे आहेत.
आकडेवारी -
लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलच्या मते जगभरात अंदाजे 3.6 कोटी लोक आंधळे आहेत आणि एकट्या भारतात ही संख्या जगाच्या एक चतुर्थांश म्हणजे 88 लाख इतकी आहे. दृष्टीदोष ही एक सर्वात मोठी समस्या आहे. देशात कॉर्नियल अंधत्वाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी दरवर्षी सुमारे 2.5 लाख कॉर्नियाची आवश्यकता असूनही, कॉर्निया दान करणाऱ्यांची संख्या फक्त 25 हजार इतकीच आहे.