हैदराबाद - कोरोना महामारीच्या काळात किंवा महामारी पश्चात नोकरीवर रुजू होत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रती कंपन्यांनी 'मानव केंद्रित' दृष्टिकोन बाळगावा यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) शुक्रवारी नव्या मार्गदर्शक सूचना प्रस्तावित केल्या आहेत.
ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थांचे शाश्वत पुनुरुज्जीवन करण्यासाठी कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटण्याची गरज आहे. तसेच काम करताना कोरोना विषाणूशी संबंधित अनावश्यक जोखमींना तोंड द्यावे लागणार नाही याची खात्री त्यांना वाटणे आवश्यक आहे.
आयएलओचे पॉलिसी उपमहासंचालक डेबोरा ग्रीनफिल्ड म्हणाले, “कामावर परत येण्यापूर्वी आपणास कोणत्याही अनावश्यक जोखमींचा सामना करावा लागणार नाही असा विश्वास कामगारांमध्ये असणे गरजेचे आहे. उद्योगांना आणि अर्थव्यवस्थांना लवकरात लवकर रुळावर आणण्यासाठी कामगारांना आवश्यक त्या नवीन उपाययोजनांना सहकार्य करावे लागणार आहे. "
गंभीर आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारात घेतले पाहिजे असे या सूचनांमध्ये सूचित करण्यात आले आहे. यामध्ये वृद्ध कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी, ज्या कर्मचाऱ्यांना पूर्वीपासून काही आजार आहेत, तसेच असंघटित क्षेत्रातील निर्वासित, स्थलांतरित, कर्मचाऱ्यांचा विचार होणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कर्मचाऱ्यांना नोकरीवर पुन्हा बोलविताना लिंग, आरोग्याची स्थिती किंवा इतर घटकांशी संबंधित भेदभाव निर्माण होणार नाही यासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.
देशाची अर्थव्यवस्था संतुलित पद्धतीने पुनर्प्रस्थापित करताना प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या नवीन उपायांना कामगारांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये सार्वजनिक संवाद विशेष महत्त्वपूर्ण असेल जेणेकरून धोरणे आखताना आणि त्याची अंमलबजावणी करताना आवश्यक ती माहिती / सूचना मिळत राहतील असे आयएलओचे उपमहासंचालक म्हणाले.
कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम'च्या धोरणाचे पालन करण्याची शिफारस आयएलओने केली आहे. तसेच कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी प्रत्यक्ष मिटिंग ऐवजी व्हर्च्युअल मीटिंगला प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे.
“कामाच्या स्वरूपानुसार आणि ठिकाणानुसार अंमलबजावणीचे विशिष्ट उपाय आयएलओने सुचविले आहेत. मात्र, स्वच्छता आणि हायजिन पद्धतीबरोबरच शिंक आल्यास होणारा संसर्ग टाळण्यासाठी प्लॅस्टिक गार्ड, कार्यालयात/कामाच्या ठिकाणी खेळती हवा, कामाच्या वेळेत लवचिकपणा या सगळीकडे लागू होतील अशा सूचना या मार्गदर्शक तत्वात आहेत.
कामाच्या ठिकाणी जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी पाच टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.
- धोका ओळखणे
- धोका कोणाला आणि कसा होऊ शकतो ते ओळखणे
- जोखमीचे मूल्यांकन करणे आणि सुरक्षा आणि आरोग्य जोखीम नियंत्रक उपाय ओळखून निर्णय घेणे
- जोखीम नियंत्रक उपायाची कोणती जबाबदारी कोणावर आहे आणि ती जबाबदारी पार पाडत असताना किती वेळ लागू शकतो याची नोंद करून ठेवणे.
- निरीक्षणांची नोंद करणे. जोखमीच्या मूल्यांकनाचे परीक्षण आणि पुनरावलोकन करणे आणि आवश्यकतेनुसार ते अद्ययावत करणे.