जगातील सर्वात चैतन्यमय शहराचा किताब मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हैदराबादच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. संयुक्त राष्ट्रासोबत काम करणाऱ्या आर्बर डे फाऊंडेशनकडून हैदराबादचा 2020 या वर्षातील 'ट्री सिटी' म्हणून गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तेलंगणा सरकारच्या एक कोटी वृक्षांची पूजा करण्यासाठीच्या 'कोटी वृक्षर्चण' या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या शुभारंभानंतर दुसऱ्याच दिवशी शहराला हा बहुमान मिळाला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या वाढदिवसाला या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा बहुमान मिळविणारे हैदराबाद हे देशातील पहिले आणि एकमेव शहर ठरले आहे. शहरातील पर्यावरणप्रेमींमधून यावर आनंद व्यक्त केला जात आहे.
हरीत मोहिमेत सर्वांचा सहभाग
हरीत तेलंगणा या उपक्रमासाठी राज्यसभा खासदार संतोष कुमार यांनी पुढाकार घेत ग्रीन इंडिया चॅलेंज जुलै 2017 मध्ये सुरू केले. याच मोहिमेप्रमाणेच हरीत हरम आणि कोटी वृक्षर्चण मोहिमेसाठीही नागरिकांचा चांगलाच उत्साह बघायला मिळाला. राज्य सरकारने सुरू केलेल्या हरीत उपक्रमात सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनीही सहभाग नोंदविला. यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे ध्येय साध्य करणे शक्य झाले. राज्याच्या दीर्घकालीन हितासाठीचा हा एक मोठा यज्ञच आहे. पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही या मोहीमेचे दीर्घकालीन फायदे होणार आहेत. वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे जतन आणि संवर्धनासाठीही राज्य सरकारने चांगले धोरण आखल्यानेच हरीतक्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. हैदराबादला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय बहुमानामुळे हरीत पट्टा वाढविण्याच्या दृष्टीने शहरांमध्ये निकोप स्पर्धेला चालना मिळणार आहे. नागरिकांच्या सक्रीय सहभागामुळेच हरीत भारताचे स्वप्न साकारणे आपल्याला शक्य होणार आहे.
प्रदुषणामुळे लाखो नागरिकांचा मृत्यु
गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणतज्ज्ञ हरीतक्षेत्र वृद्धीसाठी वैयक्तिक आणि सामाजिक सहभागावर जोर देत आहेत. मात्र तरीही प्रदूषणाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ग्रीन पीस या संस्थेने केलेल्या अभ्यानुसार वायू प्रदुषणामुळे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि लखनौ या शहरांमधील 1.2 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर याच शहरांमध्ये वायू प्रदुषणामुळे होणाऱ्या आजारांवर 1.3 लाख कोटींचा खर्च होत असल्याचेही या अभ्यासात दिसून आले आहे.
सर्वच देशांना प्रदुषणाचा फटका
पर्यावरणीय प्रदुषणाचा जगभरातील सर्वच देशांना फटका बसत आहे. याचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या 67 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी हरीतक्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शेजारील चीनने मात्र हरीत पट्टा वाढविण्याचे ध्येय मोठ्या प्रमाणात साध्य केले आहे. वार्षिक 25 टन कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने चीनने हरीत पट्ट्यात वाढ केली आहे. या हरीत उपक्रमाचे सकारात्मक परिणाम चीनमध्ये दिसून आले आहे. याशिवाय कोस्टारिकाने हरीतक्षेत्र 21 टक्क्यांहून 52 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात यश मिळविले आहे. ब्राझिलनेही आपले हरीत क्षेत्र 60 टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. वृक्ष संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून राबविलेल्या मोहिमेतूनच हे यश साध्य झाले आहे.
हरीत भारताचे स्वप्न साकारण्यात होईल मदत
वातावरणातील तापमानाचे संतुलन राखण्यासोबतच पाण्याचा प्रवाह नियमित करण्यातही झाडांची मदत होते. मानवाच्या चांगल्या भविष्यासाठी झाडे अत्यंत महत्वाची आहेत. हरीत भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. हैदराबादने मिळविलेले यश या मोहिमेसाठी प्रेरणादायक ठरले तर हरीत भारताची संकल्पना सिद्धीस जाण्यास नक्कीच मदत होणार आहे.