पणजी - गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या साखळी विधानसभा मतदारसंघातील कोठंबी (उत्तर गोवा) गावातील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी तथा प्रदेश भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुलक्षणा सावंत उपस्थित होत्या. यावेळी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा पंचायतीला मोठा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या नेतृत्वाखालील गोवा सरकारने अंदाजपत्रकात जिल्हा पंचायतीसाठी निधीची तरतूद केली आहे. त्याबरोबर 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून दोन्ही जिल्हा पंचायतीसाठी प्रत्येक साडेसात कोटी या प्रमाणे पंधरा कोटी विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. दोन्ही जिल्हा पंचायतीमध्ये भाजपाचा विजय निश्चित होईल, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मतदानानंतर व्यक्त केली.
भाजपा प्रत्येक निवडणूक 100 टक्के तयारीने लढते. मागील 18 महिन्यात माझ्या नेतृत्वातील सरकारने ग्रामीण भागात विकास पोहचवला आहे. यापुढे अधिक विकास करण्यासाठी लोकांनी भाजपाला निवडूण द्यावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
शांततेत मतदान -
आजपर्यंत रस्ता आणि वीज म्हणजे विकास मानले जात होते. परंतु, यापूढे ग्रामीण विकास म्हणजे शेती, दुग्धोत्पादन याकडेही पाहिले जाईल. नवे सदस्य त्यासाठी काम करतील, अशी खात्री आहे. जिल्हा पंचायतीसाठी 80 टक्के लोक मतदान करतात. मात्र, यंदा कोरोनामुळे थोडा परिणाम पाहयला मिळेल. तसेच शांततेत मतदान पूर्ण होईल, याची खात्री आहे, असे ते म्हणाले.
भाजपला पूर्ण बहुमत मिळणार -
आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या योजनांमुळे मतदारांचा भाजपाकडे कल आहे. त्यामुळे दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. खाणप्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला असून पुढील सहा महिन्यात हा प्रश्न निकाली निघेल, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा - 'जी हुजुरी करणाऱ्या उत्तरेतील राजकारण्यांना शरद पवारांची नेहमीच भीती वाटते'