हैदराबाद - कोरोना महामारीच्या काळात युनिसेफने पालकांना त्यांच्या मुलांचे आरोग्य, सुरक्षा, पोषण, शिक्षण आणि वैयक्तीक विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः ज्यांची मुलं सहा वर्षाखालील आहेत, त्यांची विशेष काळजी घ्यावी, असे युनिसेफने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. सहा वर्षांखालील मुलांचे मन जलद गतीने विकसित होत असते. विशेषतः सुरुवातीच्या ३ वर्षांच्या आत मुलाची मानसिक क्षमता वेगाने विकसित होत असते, असेही या अहवालात नमुद केले आहे.
म्हणूनच, या तणावपूर्ण कालावधीत पालकांना लहान मुलांच्या सर्वांगीण विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जात आहे. सध्याच्या या कोवीड -१९ च्या महामारीमुळे पालकांवर अत्याधिक दबाव निर्माण झाला आहे. तसेच त्यांची असुरक्षिततेसोबतच भविष्याची चिंताही वाढली आहे. तथापि, अशा महाभंयकर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पालकांना स्वत:च्या सुरक्षतेसोबतच हितचिंतक आणि नातेवाईकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी विविध उपायांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
युनिसेफने नुकताच ‘अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट इन द कन्ट्री’ अशा शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आरोग्य, सुरक्षितता आणि कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या अनुषंगाने सहा वर्षाखालील मुलांची काळजी घेण्यासाठी पालकांच्या आणि वडिलधाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेवर भर दिला आहे.
कोरोना विषाणूमुळे पाल्य आणि पालकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. या नैराश्याच्या काळात सहा वर्षांखालील लहान मुलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशाप्रसंगी प्रौढांनी त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने विविध उपायांचा अवलंब केला पाहिजे. तसेच लहान मुलांसोबत महत्त्वपूर्ण वेळ घालवत असताना, त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूबद्दलची जागृकता निर्माण करणेही आवश्यक आहे, असे युनिसेफने आपल्या अहवालात म्हटले आहे.
कोरोना महामारीने पालक आणि मुलांसाठी अनेक नवीन आव्हाने निर्माण केली आहेत. या विषाणूच्या होणाऱ्या दुष्परिणामांमुळे लहान मुले अत्यंत चिंतित आहेत. तसेच अंगणवाड्या आणि शाळा बंद ठेवल्याने त्यांचे दैनंदिन जीवन अक्षरशः बदलून गेले आहे. तर दुसरीकडे यांच्या वैयक्तीक हालचालींवर अनेक कठोर बंधने लादली जात आहेत. या कोरोना संकटकाळात मुलांबद्दल सकारात्मक दृष्टीकोन आणि योग्य काळजी घेतल्यास त्यांच्या भावनिक आणि मानसिक समस्या सुटू शकतात. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मुलांनी काय करावे? किंवा कोरोना विषाणूला हरवण्यासाठी कोणती तयारी करावी. याविषयीची स्पष्ट आणि सखोल माहिती पालकांनी मुलांना देणे गरजेचे असल्याचे युनिसेफच्या अहवालात म्हटले आहे. तसेच मुलांसमवेत जास्तीत जास्त वेळ घालवून त्यांचा एकटेपणा टाळण्यासाठी मुलांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असताना कोणती काळजी घ्यावी? यामध्ये स्पष्टता आणण्यासाठी, युनिसेफच्या अहवालात पुढील पाच मुद्यांचा समावेश करण्यात आला आहेः
- आरोग्य
लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे आणि कोरोना संक्रमण टाळण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. तसेच मुले आजारी पडल्यानंतर त्यांना त्वरित योग्य उपचार दिला पाहिजे.
- आहार आणि पोषण
गर्भवती महिला, अर्भके आणि लहान मुलांना योग्य पोषण मिळणे गरजेचे आहे. गर्भवती महिलांना दिलेल्या पौष्टिक आहारावरच मुलांचे आरोग्य आणि पोषण अवलंबुन असते, हे विसरुन चालणार नाही.
- सुरक्षितता आणि खबरदारी
एखादा वाईट किंवा गंभीर अनुभव मुलांमध्ये कायमची भीती आणि मानसिक चिंता निर्माण करु शकतो. यामुळे या संकटकाळात मुले हिंसाचार आणि अत्याचारपासून मुक्त आहेत का? याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
- अन्न व सामाजिक संबंध
मुलांना जर मुक्तपणे वाढण्याचे स्वातंत्र दिले, तर ते समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करु शकतात. त्यामुळे मुलांशी सतत संवाद साधण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे.
- शिक्षण आणि विकास
पालकांचा सततचा सहभाग आणि सकारात्मक वातावरण मुलांना जलद आणि खुप चांगल्या पद्धतीने शिकण्यात मदत करू शकतो. एखाद्याशी बोलणे, गायन करणे, खेळणे, हसणे, अभिनय करणे किंवा स्वत: ची काळजी स्वतः घेण्यास शिकवणे तसेच एखाद्याशी बोलताना डोळ्यांचा संपर्क राखणे अशाप्रकारच्या शिकण्याच्या संधी निर्माण केल्याने मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. आपले पाल्य अशा सर्व उपक्रमांपासून वंचित राहणार नाही, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. त्याचबरोबर पालकांनी मुलांसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवणेही आवश्यक आहे.