नवी दिल्ली - कोविड-१९ प्रतिबंध आणि उपचार सेवा क्षेत्रात कार्यरत कंपन्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचबरोबर या क्षेत्रात कार्यरत संशोधकांसाठी देखील काही शिफारशी करण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शक सूचनांनुसार, नवीन औषधे आणि जैविक उत्पादनांच्या अभ्यासासंदर्भात संशोधकांना अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच कोरोना विषाणूच्या संदर्भात वैद्यकीय चाचण्या घेणाऱ्या उत्पादनांविषयी शिफारशी करता येणार आहेत.
कोविड १९ प्रतिबंध आणि उपचार साधनांच्या विकासास जलदगतीने मदत करण्यासाठी आमचे कर्मचारी जगातील सर्वोत्तम नवनिर्मिती करणाऱ्या कल्पक व्यक्ती आणि संशोधकांसमवेत २४ तास कार्यरत आहेत असे एफडीए कमिश्नर स्टीफन एम. हैन यांनी म्हटले आहे.
"कोविड १९ पीडित लोकांना फायदा होऊ शकेल अशा सुरक्षित आणि प्रभावी उपचारांच्या तपासणीचा वेग वाढविणे हे एफडीएच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. वैद्यकीय उपकरणांचा जलदगतीने विकास करण्यासाठी आणि त्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी आम्ही आमची नियामक लवचिकता वापरत आहोत. तसेच आमच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रत्येक साधनांचा वापर करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे नवोदितांना आणि संशोधकांना त्यांचे संशोधन विकसित करण्यासाठी मदत होईल,”असे त्यांनी एफडीएच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर लगेचच कोविड-१९ विरूद्ध लढण्यासाठी वैद्यकीय प्रतिरोध वाढविण्यासाठी एफडीएने विविध आरोग्य भागीदारांसह काम करण्यास सुरवात केली.
एफडीएने सुरू केलेल्या 'कोरोनाव्हायरस ट्रीटमेंट अॅक्सीलरेशन प्रोग्राम'मुळे रूग्णांना नवीन वैद्यकीय उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली तसेच त्याच वेळी त्याचा प्रभाव निश्चित करण्यात आला.
एफडीएने आतापर्यंत कोविड-१९ वरील संभाव्य औषधांच्या १३० वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. विषाणू प्रादुर्भावाचे गुणोत्तर प्रमाण वाढू नये म्हणून विषाणू प्रतिबंधक औषधांशी संबंधित अशा अनेक उपचारांचा अभ्यास करण्यात येत आहे. तसेच, विषाणूमुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवरील नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी 'इम्युनोमॉड्युलेटर्स' नावाच्या थेरपीचा अभ्यास सुरु आहे.
मार्गदर्शक सूचनांमध्ये, कोविड-१९ संबंधित औषधे आणि जैविक उत्पादनांसाठीच्या पूर्व-आयएनडी (इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग अॅप्लिकेशन) संदर्भात वेळ देण्याच्या विनंतीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे क्लिनिकल चाचण्या लवकरात लवकर सुरू करण्याच्या उद्देशाने संशोधकांना त्यांच्या डेटाविषयी संबंधित संस्थेकडून लवकर अभिप्राय प्राप्त होऊन पुढील रूपरेषा आखता येईल.
इतर मार्गदर्शक सूचनांमध्ये औषधे किंवा जैविक उत्पादनांच्या विकासासंबंधित सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोविड-१९ प्रतिबंध उत्पादनांच्या सुरक्षितता आणि प्रभावीततेच्या उद्देशाने महत्त्वाच्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांवरील एफडीएच्या सद्य शिफारसी उपलब्ध आहेत.
एफडीएच्या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक साधनांना वेग देण्याच्या कार्याव्यतिरिक्त, एफडीएने कोविड-१९ची लस आणि उपचारांच्या विकासास वेग देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य संस्था आणि इतरांसह सार्वजनिक-खाजगी भागीदारीत काम करण्याचे जाहीर केले होते.