राष्ट्रीय पातळीवर भाजपाला सक्षम पर्याय देण्याची क्षमता केवळ काँग्रेसमध्ये आहे. परंतु, विरोधी पक्ष संपूर्ण निष्क्रिय झाला असून अंतर्गत लोकशाहीचा अभाव आणि त्यातच भविष्यातील वाटचालीसाठी पक्षाकडे कोणतेही नवीन धोरण, नवी दृष्टी नसल्याचे नुकतेच पक्षातून निलंबित करण्यात आलेले पक्षाचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ पत्रकार अमित अग्निहोत्री यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
मुलाखतीचा सारांश:
- काँग्रेस आज इतक्या गोंधळलेल्या अवस्थेत का आहे?
याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आमच्याकडे 2024 मध्ये काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. तसेच पक्षांतर्गत लोकशाहीच्या अभावी एआयसीसी ही कोअर कमिटी कमजोर झाली आहे. कोणाकडे नक्की कोणती जबाबदारी आहे याबद्दल लोकांना कोणतीही स्पष्टता नाही. पक्षात संघटनात्मक कमकुवतपणा, नेतृत्वाची पोकळी आणि अगदी वैचारिक गोंधळ आहे. या तिन्ही घटकांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. राज्यातील नैतृत्वाला प्रोत्साहित करण्याची आणि पक्षात उत्साह आणण्यासाठी अंतर्गत लोकशाही प्रबळ बनवण्याची गरज आहे.
- या परिस्थितीला जबाबदार कोण?
पक्षाचे नैतृत्चच नेहमी अशा परिस्थितीला जबाबदार असते. त्यामुळे याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्ष व काँग्रेस कार्यकारी समितीवरच असणार आहे. त्यांनीच एकत्रितपणे पुढे येऊन पक्षाच्या होत असलेल्या घसरणीबद्दल आम्हाला स्पष्टीकरण दिले पाहिजे. यामुळे भाजपचे काम सोपे झाले आहे.
- नेतृत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सीडब्ल्यूसीने बैठक घेतली परंतु आहे तीच स्थिती कायम ठेवण्यात आली, याबद्दल काय सांगाल?
23 वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे जर पक्षाने दुर्लक्ष केले तर ते स्वतःला खाईत नेणारे असेल. या पक्षासाठी खूप चांगल्या शिफारसी आहेत आणि राजकीय दृष्टीकोनातून हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पक्षातील वरिष्ठ आणि तरुण नेत्यांकडून या शिफारसी आल्या आहेत. यातून पक्षाला एक स्पष्ट संदेश आहे की आपण स्वतःला पुन्हा नव्याने बदलण्याची गरज आहे. जर काँग्रेस पक्ष आता बदलला नाही. तर आपण आपलाच मृत्यू लिहीत आहोत हे पक्षाने लक्षात घेतले पाहिजे.
- काँग्रेस पक्षात खरोखरच खूप नाराज / अस्वस्थ लोक आहेत ?
मी त्यांना नाराज किंवा अस्वस्थ म्हणणार नाही, मी त्यांना पक्षातील लोकशाहीचा आवाज म्हणतो. हे लोक वैचारिकदृष्ट्या काँग्रेसशी वचनबद्ध आहेत आणि पक्षाचे उत्कृष्ट प्रतिनिधी आहेत. त्यांचा विश्वास आहे की केवळ काँग्रेसच भाजपला टक्कर देऊ शकेल. पत्रात व्यक्त केलेल्या मतांशी तब्बल ३०० हुन अधिक नेते सहमत आहेत.
- या परिस्थितीला सुसंगत असे पक्षाने काय केले पाहिजे?
सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे सक्रिय आणि जमिनीवर जाऊन काम करणाऱ्या नैतृत्वाची कांग्रेस अध्यक्ष म्हणून नेमणूक करणे आवश्यक आहे. जो कार्यकर्त्यांना संघटित आणि प्रोत्साहित करेल व मतदारांना आकर्षित करू शकेल. पक्षाला असे नैतृत्व हवे आहे जे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठांपर्यंत भाजपाचा सामना करण्याची इच्छाशक्ती निर्माण करू शकेल. सद्यस्थितीत आमचे कार्यकर्ते निराश आणि आत्मविश्वास गमावून बसले आहेत. आम्हाला असा नेता हवा आहे, जो पक्षाला एक व्हिजन देईल आणि त्याच्या पूर्तीसाठी कठोर परिश्रम करेल. पक्षात असे अनेकजण आहेत जे मीडिया, उद्योग जगत आणि व्यापार यांच्यासह, बुद्धिजीवी आणि मध्यमवर्गाशी जोडून घेऊन काम करण्यासाठी तयार आहेत. मात्र त्यांना दुर्लक्षित केले गेले आहे.
- राहुल गांधी लवकरच काँग्रेस अध्यक्ष म्हणून परत येऊ शकतात अशी चर्चा आहे, ते पुन्हा सूत्रे हाती घेतील?
श्री. गांधी यांनी जाहीरपणे सांगितले आहे की त्यांना काँग्रेस अध्यक्ष व्हायचे नाही. प्रियांका गांधी वाड्रा यांनी राहुल गांधींच्या मताचे समर्थन केले असून त्यांनी देखील बिगर गांधी कुटुंबातील व्यक्ती काँग्रेसचा प्रमुख असावा असे म्हटले आहे. सोनिया गांधी या केवळ पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा आहेत. त्यामुळे काँग्रेसचा अध्यक्ष बनण्यात गांधी कुटुंबाला रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या घटनेनुसार आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेद्वारे सीडब्ल्यूसीने त्वरित नवीन काँग्रेस अध्यक्ष नियुक्त केला पाहिजे.
- काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी तुम्ही काही तार्किक आणि वैध मुद्दे मांडले होते परंतु त्यामुळे तुम्हाला निलंबित केले गेले. अजूनही काही आशा आहे ?
मी आशावादी आहे. पक्षाला एक विलक्षण इतिहास आहे. त्यात प्रतिभा आणि विचारसरणी आहे. दुर्दैवाने, आम्ही हातपाय गाळून निष्क्रिय झालो आहोत आणि मतदारांना प्रेरणा देऊ शकेल, अशी आमची कामगिरी राहिलेली नाही. त्यामुळेच लोकांचा काँग्रेसवरील विश्वास कमी झाला आहे. सर्वसमावेश असा शेवटच्या घटकापासून ते वरच्याचा देखील विचार होऊ शकेल, असा दृष्टिकोन असला पाहिजे. पक्षात हाय कमांडची संस्कृती असू नये. भाजपा विचारसरणी आणि कारभाराचे मॉडेल संपूर्णपणे वेगळे आहे. परंतु, भाजपला पराभूत करणारा एकमेव भक्कम राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस. त्यामुळे भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेसला नवीन मॉडेल द्यावे लागेल. लोकांनी पक्षाला पुन्हा निवडून देऊन शासन करण्याची संधी द्यावी यासाठी मतदारांना प्रेरणा दिली पाहिजे.
- एक बिगर गांधी काँग्रेसला प्रभावी नेतृत्व देऊ शकेल?
मला यामुळे काही फरक पडत नाही. प्रत्येक व्यक्तीकडे स्वत: ची एक शक्ती, शैली आणि रणनीती असते जी विचारात आणली जाते. काँग्रेसला एक नवीन दृष्टिकोन आणि त्यासाठी एक मजबूत रोडमॅप आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्यास संधीच न देता त्याच्याकडे ते गुण नाहीत असे कसे म्हणता येईल.